मीरा - भाईंदरच्या मुख्य रस्त्याचे होणार पूर्ण डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:19 IST2021-04-08T00:19:17+5:302021-04-08T00:19:24+5:30
पॅचवर्कमुळे झाली होती दुरवस्था; गीता जैन यांच्याकडून पाठपुरावा

मीरा - भाईंदरच्या मुख्य रस्त्याचे होणार पूर्ण डांबरीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते काशीमीरा नाका पर्यंतच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्ग या मीरा- भाईंदर शहराच्या मुख्य रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाचे काम एमएमआरडीए करून देणार आहे . आमदार गीता जैन यांच्या पाठपुराव्याने १८ वर्षांनी पहिल्यांदाच या रस्त्याचे पूर्णपणे डांबरीकरण होणार आहे.
२००२ मध्ये शहराच्या या मुख्य रस्त्याचे काम सुरु झाले होते. याच रस्त्यातून मुख्य जलवाहिनी ही टाकली आहे . गेल्या १८ वर्षात विविध कारणांनी या रस्त्यावर खोदकाम केले. पॅचवर्कमुळे रस्त्यात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यातही खड्डे पडल्यावर पॅचवर्कचे काम केेले जाते. कोट्यवधी खर्चूनही पॅचवर्क टिकत नाही असा अनुभव आहे.
सततच्या पॅचवर्कमुळे मुख्य रस्त्याचा समतोलच राहिलेला नाही. सध्या येथे मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रो मार्गासह उन्नत रस्ताही बांधला जाणार आहे. मेट्रोच्या कामाच्या अनुषंगाने रस्त्याचे काम पूर्णत्वास जाण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी हा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण करून सुस्थितीत आणावा म्हणून आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता.
या अनुषंगाने एमएमआरडीएने काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गोल्डन नेस्टच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापर्यंतच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास मंजुरी दिली आहे. या कामाचे भूमिपूजन जैन यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी शिवसेना गटनेत्या नीलम ढवण, नगरसेवक राजू भोईर, धनेश पाटील आदी उपस्थित होते.