भिंती विसरले की ग्रुप डिस्कशनसाठी सोय? शौचालयाच्या अजब उभारणीवरुन मिरा-भाईंदर प्रशासनावर टीकांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:40 IST2026-03-06T16:36:25+5:302026-03-06T16:40:36+5:30

मिरा भाईंदरमध्ये सार्वजिनक शौचालयात एकाच रांगेत चार शौचालयाची भांडी

Mira Bhayandar Bizarre Public Toilet Four Squat Pans in One Row Without Partitions Sparks Outrage | भिंती विसरले की ग्रुप डिस्कशनसाठी सोय? शौचालयाच्या अजब उभारणीवरुन मिरा-भाईंदर प्रशासनावर टीकांचा पाऊस

भिंती विसरले की ग्रुप डिस्कशनसाठी सोय? शौचालयाच्या अजब उभारणीवरुन मिरा-भाईंदर प्रशासनावर टीकांचा पाऊस

Mira-Bhayandar Toilet: आपल्या अजब पायाभूत सुविधांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मिरा-भाईंदर शहराने आता पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच एका उड्डाणपुलाच्या विचित्र रचनेमुळे टीकेचे धनी ठरलेल्या येथील प्रशासनाने आता सार्वजनिक स्वच्छतेच्या नावाखाली एक असा नमुना सादर केला आहे, जो पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.

भाईंदर पूर्व येथील आरएनपी पार्क परिसरात महापालिकेच्या एका सार्वजनिक शौचालयाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका रांगेत चार भारतीय पद्धतीची शौचालयाची भांडी बसवण्यात आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या चार भांड्यांच्या मध्ये कोणतीही भिंत, पडदाही नाही.

हे दृश्य पाहून नेटीझन्सनी प्रशासनाची चांगलीच टीका केली आहे. कुणी याला रोमन काळातील शौचालय म्हटले आहे, तर कुणी याला 'एक्सट्रोवर्ट लोकांसाठीचे खास ठिकाण म्हणून हिणवले आहे. सोशल मीडियावर ग्रुप डिस्कशन स्पॉट अनलॉक्ड अशा कमेंट्सचा पूर आला असून, महापालिकेने सार्वजनिक या शब्दाचा अर्थ फारच गांभीर्याने घेतला आहे," असा टोलाही लगावला जात आहे.

स्वच्छतेचा पत्ता नाही

केवळ गोपनीयताच नाही, तर या ठिकाणची दुरवस्थाही संतापजनक आहे. व्हिडीओमध्ये फरशांवर घाणीचे साम्राज्य असून देखभालीचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दोन भांड्यांमध्ये आडोसा करण्याऐवजी प्रशासनाने समोरच्या बाजूला पडदे लावले आहेत, जे अत्यंत हास्यास्पद वाटते.

शहरात शौचालयांच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मग अशा कामांना मंजुरी देणारे इंजिनिअर्स नक्की करतात काय? असा सवाल भाजप नेते रवी व्यास यांनीही उपस्थित केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाचा बचावात्मक पवित्रा

या प्रकरणावर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सावध प्रतिक्रिया दिली आहे. "हे शौचालय जुने असून तिथे केवळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. जर कामात अशा त्रुटी असतील, तर त्याची पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल," असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

मिरा-भाईंदरमधील या भयंकर कारागिरीमुळे सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची आणि प्रतिष्ठेची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. आता पालिका प्रशासन ही चूक सुधारते की हा विचित्र नमुना असाच कायम राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title : मीरा-भायंदर में बिना दीवारों के शौचालय पर हंगामा; जांच की मांग तेज।

Web Summary : मीरा-भायंदर प्रशासन बिना विभाजन वाले शौचालय ब्लॉक के निर्माण के लिए आलोचना का सामना कर रहा है। अगल-बगल भारतीय शैली के शौचालयों वाले इस अजीब डिजाइन ने ऑनलाइन आक्रोश और उपहास को जन्म दिया है, नागरिकों ने सार्वजनिक स्वच्छता और गोपनीयता की नगरपालिका की समझ पर सवाल उठाया है। अधिकारियों ने जांच करने और स्थिति को सुधारने का वादा किया है।

Web Title : Mira-Bhayandar's wall-less toilet sparks outrage; calls for investigation intensify.

Web Summary : Mira-Bhayandar's administration faces criticism for constructing a toilet block without partitions. The bizarre design, featuring side-by-side Indian-style toilets, has drawn ire and ridicule online, with citizens questioning the municipality's understanding of public sanitation and privacy. Officials have promised to investigate and rectify the situation.