मीरा-भार्इंदर : पाणी टंचाई दूर करा अन्यथा बादली व अस्वच्छ कपडे आंदोलन छेडू; काँग्रेसचा पालिकेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 21:37 IST2018-03-14T21:37:46+5:302018-03-14T21:37:46+5:30
शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून

मीरा-भार्इंदर : पाणी टंचाई दूर करा अन्यथा बादली व अस्वच्छ कपडे आंदोलन छेडू; काँग्रेसचा पालिकेला इशारा
भार्इंदर : शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून त्याची दखल न घेतल्यास पालिका मुख्यालयात अस्वच्छ कपड्यांसह बादली आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे.
पालिकेने पाणीपुरवठा वाढताच नवीन नळजोडणी देण्यास सुरुवात केली. त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करुन नवीन नळजोडण्या देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता पालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्यासाठी कुणालाही वंचित न ठेवता सरसकट सर्वांनाच नवीन नळजोडणी देण्याचे आदेश पालिकेला दिले. यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडले. त्यातच अनधिकृत नळजोडण्यांना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पाणीपुरवठ्याच्या समस्येत भर पडली आहे. यामुळे ऐन पाणीकपातीच्या कालावधीत पुर्वीच्या अधिकृत नळजोडणीधारकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा वाढल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने अचानकपणे नागरीकांना वाढीव बिले वितरीत केली. यावर तत्कालिन महासभेत चर्चा झडताच आयुक्त बळीराम पवार यांनी वाढीव बिलांत दुरुस्ती करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले. तोपर्यंत नागरीकांनी पाण्याच्या बिलांचा भरणा केलेला नाही. परंतु, दुरुस्ती झालेली बिले अद्याप नागरीकांना वितरीत न करता वाढीव बिलांची रक्कम न भरणाऱ्या नागरीकांचा पाणीपुरवठाच खंडीत करण्याच्या कारवाईसाठी पालिकेचे कर्मचारी परिसरात फिरत असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. वाढीव पाणीपुरवठ्यामुळे पुर्वीच्या सुमारे ६० ते ७० तासांचे अंतर वाढीव पाणीपुरवठ्यामुळे २५ तासांवर आले असताना ते कपातीमुळे पुन्हा ७० तासांवर गेले आहे. यामुळे प्रभाग ९, १६, १७, १९ व २२ मधील नयानगर, सृष्टी, शांतीनगर, गोविंद नगर, भारती पार्क, नुपूर, शीतल नगर, शांतीपार्कमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचा दावा सांवत यांनी केला आहे. सुर्या धरणातून २०० एमएलडी पाणी शहरात आणण्याचे आश्वासन पालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांनी मोठमोठ्या होर्डींगद्वारे नागरीकांना दिले असले तरी त्यांना शहराला लागू करण्यात आलेली पाणी कपात, राज्यात स्वपक्षाचे सरकार असताना देखील रद्द करता येत नसल्याचा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. येत्या ८ दिवसांत प्रशासनाने निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करावी अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.