गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:34 IST2025-09-09T13:33:57+5:302025-09-09T13:34:55+5:30

Gorai Beach Mini Bus Viral Video: भरती सुरू असतानाच वाळूवरून चालवलेली बस अचानक पाण्यात अडकली. लाटांच्या माऱ्याने मिनीबस हळूहळू पाण्यावर तरंगू लागली आणि चाकाखालची वाळू सरकल्याने ती अडकली.

Minibus gets stuck in high tide at Gorai Beach; Driver's life-threatening bravery, rescued after three hours... | गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...

गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...

मुंबई : गोराई बीचवर सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. पर्यटकांना बंगल्यात सोडून परतणारी एक मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली. प्रशासनाने स्पष्ट मनाई केली असतानाही बस समुद्रकिनाऱ्यावर नेल्यामुळे राकेश गिरी (२७) या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, गोराई येथील काही निवासी बंगल्यांमध्ये पर्यटकांना पोहोचवून चालक सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता परत येत होता. मुख्य रस्त्याऐवजी त्याने समुद्रकिनाऱ्याचा मार्ग निवडला.

भरती सुरू असतानाच वाळूवरून चालवलेली बस अचानक पाण्यात अडकली. लाटांच्या माऱ्याने मिनीबस हळूहळू पाण्यावर तरंगू लागली आणि चाकाखालची वाळू सरकल्याने ती हलविणे अशक्य झाले. अखेर चालकाने बसबाहेर उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.

दोरखंडाच्या साहाय्याने बस पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बस पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

घटना सोशल मीडियावर

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात गर्दी जमली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किनाऱ्यावर वाहन नेण्यास मनाई असतानाही चालकाने निष्काळजीपणे मिनीबस तिकडे नेली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Minibus gets stuck in high tide at Gorai Beach; Driver's life-threatening bravery, rescued after three hours...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.