मीरारोडमध्ये बेकायदा बोअरिंगच्या पाण्यावर मिनरल पाण्याचे प्लांट, अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 00:31 IST2025-10-30T00:30:39+5:302025-10-30T00:31:44+5:30
Mira Road news Latest: भाजपाचे कार्यकर्ते असलेले सुख्खु यादव आदी आरोपी हे पाणी माफिया आणि अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

मीरारोडमध्ये बेकायदा बोअरिंगच्या पाण्यावर मिनरल पाण्याचे प्लांट, अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई
Mira Road news Marathi: डाचकुलपाडा येथील वादंगावरून आरोपी हे पाणीमाफिया आणि भूमाफिया असल्याचे समोर आले. आता तेथील भूगर्भातील बेकायदा पाणी उपसा करून, त्यावर प्लांट बसवून मिनरल वॉटर म्हणून विक्री करणाऱ्या पाणी माफियांवर कारवाईचा बडगा महसूल विभागाने उगारण्यास सुरवात केली आहे. ९ बेकायदा बोअर चालवणाऱ्या पाणी माफियांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
२१ ऑक्टोबर रोजी डाचकुलपाडा भागात रहिवाशी आणि रिक्षा चालक यांच्यात राडा झाला. त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यातील भाजपाचे कार्यकर्ते असलेले सुख्खु यादव आदी आरोपी हे पाणी माफिया आणि अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया असल्याचे आरोप होऊ लागले.
या प्रकरणी पोलीस, महापालिका आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाल्या नंतर महसूल विभागाचे अपर तहसीलदार निलेश गौड यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के, ग्राम महसूल अधिकारी आदींनी डाचकुलपाडा भागात जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी सर्रास अनधिकृत बांधकामे करून बेकायदा बोअर द्वारे पाणी उपसा करत प्लांट बसवलेले आढळले. तसेच ते पाणी मोठ्या बाटल्यां मधून भरून शहरातील नागरिकांना विक्री करून ह्या पाणी माफियांनी बक्कळ धंदा चालवला असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी यांनी अपर तहसीलदार यांना सादर केलेल्या अहवालानुसार संतोष सुखू यादव, शहाबुद्दीन फतवाणी, संजयकुमार यादव, रवींद्र नाथपाल यादव, रियाज पटेल व अब्दुल रहमान शाह ह्या यांनी बेकायदा बोअर मारून भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा करत मिनरल वॉटर प्लांटद्वारे पाणी विक्री चालवली होती.
प्रीती नवीन शाह व रंजना नामदेव भंडारी, नौशाद शेख व आरिफ शेख पाणी उपसा करून टँकर द्वारे पाणी विक्री चालवली होती. तर अजिब जुल्फी यांनी स्वतःच्या वापरा साठी बेकायदा बोअर मारली होती.
निलेश गौड मीरा भाईंदरचे अपर तहसीलदार निलेश गौड म्हणाले की, 'डाचकुलपाडा भागात ९ बेकायदा बोअर आढळून आल्या असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. प्रत्येकी १० हजारांचा दंड आकारला जाणार असून बेकायदा बोअर बंद न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल. शहरातील सर्वच बेकायदा बोअर वर कारवाई सुरु केली जाईल.'