५ वर्षांत ८ लाख घरे बांधणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुतोवाच; कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी निघाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 05:56 IST2025-02-06T05:55:53+5:302025-02-06T05:56:33+5:30
Mhada Lottery 2025: ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली.

५ वर्षांत ८ लाख घरे बांधणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुतोवाच; कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी निघाली
ठाणे : पुढील पाच वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरे उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. ही घरे उभारताना त्यांचा दर्जा उत्तम असावा. घराच्या कामाची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणीत तपासू, असे सुतोवाच शिंदे यांनी केले.
ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. यावेळी २,१४७ सदनिका आणि ११७ भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुख्य अधिकारी रेवती गायकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आदींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
प्रत्येकाचे स्वप्न असते की, आपल्याला हक्काचे घर मिळावे आणि ते चांगले व परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळावे, अशी अपेक्षा असते. हे स्वप्न पूर्ण करण्याचे काम म्हाडा करत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्याकडे आता नगरविकास आणि गृहनिर्माण खाते आहे. त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा. मात्र, घरांच्या कामाची गुणवत्ता चांगली द्या, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
गिरणी कामगार, डबेवाल्यांनाही घर
म्हाडाचे नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे, या धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवत आहोत. त्यामध्ये परवडणारी घरे, भाड्याची घरे, ज्येष्ठांसाठी घरे, काम करणाऱ्या महिलांसाठी घरे ठेवली जाणार आहेत.
मागील कित्येक वर्षे गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल या आशेवर आहेत. त्यांनासुद्धा घर दिले जाणार आहे, तसेच डबेवाल्यांना घरे दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्टुडन्ट हॉस्टेल उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुणवत्तेची तपासणी
लॉटरी निघाल्यावर घरांचा ताबा लवकर देण्याबरोबर, चांगल्या दर्जाची घरे द्या, अशी सूचना त्यांनी केली, तसेच लॉटरी लागलेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी मी स्वत: करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
३० हजार घरांची सोडत
म्हाडाने मागील दीड वर्षात तीन लॉटरी काढल्या, यापुढे म्हाडाच्या माध्यमातून लॉटरी काढली जाणार आहे. दरवर्षी म्हाडाच्या माध्यमातून ३० हजार घरांची लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.
म्हाडा लॉटरीत आपल्याला घर लागावे, या आशेने पहिल्यांदाच अर्ज केला. घर लागेल, असा विश्वास होता. पहिल्याच प्रयत्नात घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने खूप आनंद झाला. -दत्तप्रसाद पालव, लाभार्थी, कल्याण
म्हाडाचा कर्मचारी असून, भावाच्या नावाने अर्ज दाखल केला. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले असून, सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. -कृष्णा सारंग, लाभार्थी
मागील आठ वर्षांपासून म्हाडा हे बीट कव्हर करत आहे. हे करत असताना अनेकांना घरे लागल्याचे वार्तांकन केले. आज मला घर लागले याचा खूप आनंद होत आहे. -पंकज पांडे, पत्रकार
म्हाडाचे घर लागावे, यासाठी दोनवेळा प्रयत्न केला. परंतु, आता खऱ्या अर्थाने घराचे स्वप्न साकार झाले. त्यामुळे नक्कीच आनंद झाला आहे. -सलीम शेख, पोलीस, ठाणे