ठाणे - ठाणेकरांना दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेल्या ठाण्यातील मेट्रो मार्गिकेवर साेमवारी दोन कोच आणि एक इंजिन चढविले गेले. सप्टेंबर महिन्यांत हाेणाऱ्या चाचणी दरम्यान घोडबंदर मार्गावरील गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत मेट्रो धावणार आहे. त्यानंतर मेट्रो सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई आणि घोडबंदरचा प्रवास सुलभ होणार आहे. ही मार्गिका डिसेंबर अखेरपर्यंत प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचा (एमएमआरडीए) प्रयत्न सुरू आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे या भागातील रस्ते अपुरे पडत असल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. हजारो ठाणेकर कामानिमित्ताने मुंबईत स्वत:च्या वाहनाने जातात. रस्ते मार्गावरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी घोडबंदर येथील कासारवडवली-घाटकोपर- वडाळा (मेट्रो चार) आणि कासारवडवली ते गायमुख (मेट्रो चार अ) या मार्गिकांच्या उभारणीचे काम घोडबंदर भागात सुरू आहे. मेट्रोचे सर्व डबे व इंजिन ट्रॅकवर यशस्वीरीत्या चढवण्याचे काम मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले.
कामाचा विद्यार्थ्यांना बसला फटका मेट्रो बोगी चढवताना ठाण्याहून घोडबंदरकडे जाणारा रस्ता डी मार्ट याठिकाणी सिंगल लाइन तसेच लहान वाहने डी मार्ट येथून डाव्या बाजूने वळण घेऊन कासारवडवली पोलिस ठाण्यासमोरून आनंदनगरकडे वळविली. डी मार्ट ते आनंद नगर सिग्नल या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावण्यात येऊन ते वाहनांना दिशा दर्शविण्याचे काम करीत आहेत. साेमवारी सकाळी ६ ते ९ या काळात शाळकरी मुलांनाही या काेंडीचा सामना करावा लागल्याचे पाहावयास मिळाले.