मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 23:09 IST2025-10-31T23:07:21+5:302025-10-31T23:09:31+5:30
कामा दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी मीरारोडच्या सर्वोदय संकुल जवळ वेल्डिंग करत असताना आगीच्या मोठ्या ठिणग्या खालच्या रस्त्यावर पडल्या होत्या.

मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
Mira Road News: मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ वरील कामादरम्यान वेल्डिंग काम करताना निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदार जे कुमार इन्फ्राला एमएमआरडीएने ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका आणि स्टेशन आदींचे काम एमएमआरडीएने जे कुमार इन्फ्रा ह्या ठेकेदारास दिले आहे.
कामा दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी मीरारोडच्या सर्वोदय संकुल जवळ वेल्डिंग करत असताना आगीच्या मोठ्या ठिणग्या खालच्या रस्त्यावर पडत होत्या. खालून पादचारी तसेच दुचाकी स्वार व अन्य वाहन चालक जात असताना वरून आगीच्या ठिणग्या खाली पडत होत्या.
एकदा तर आगीचा मोठा गोळा खाली पडला. खालून जाणाऱ्या मिनी टेम्पो ट्रॅव्हलर वर पडून नंतर तो रस्त्यावर पडला. ह्या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होवून एमएमआरडीए आणि ठेकेदार यांच्या बेजबाबदार कारभारावर टीकेची झोड उठली.
अखेर शुक्रवारी एमएमआरडीए ने ह्या घटनेची दखल घेत ठेकेदारने कामा वेळी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत म्हणून ५ लाखांचा दंड ठोठावला असल्याचे जाहीर केले आहे. ह्या आधी देखील काम करताना उंचावरून अवजड लोखंडी जॅक खाली पडला होता. त्यावेळी देखील टीकेची झोड उठल्यावर एमएमआरडीए ने ठेकेदार जे कुमार इन्फ्रा यांना १० लाखांचा दंड ठोठावला होता.