मेट्रो स्थानकाच्या मेडतीया नगर स्थानका नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:34 IST2025-07-28T19:28:45+5:302025-07-28T19:34:44+5:30
Mira Road: मीरारोडच्या मेडतीया नगर मेट्रो स्थानकाचे नाव रद्द करून "सेनापती कानोजी आंग्रे" किंवा "स्वातंत्र्यवीर सावरकर" असे नाव देण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.

मेट्रो स्थानकाच्या मेडतीया नगर स्थानका नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध
मीरारोड- मीरारोडच्या मेडतीया नगर मेट्रो स्थानकाचे नाव रद्द करून "सेनापती कानोजी आंग्रे" किंवा "स्वातंत्र्यवीर सावरकर" असे नाव देण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. एमएमआरडीएने मराठीद्वेष्टेपणा दाखवत बिल्डरच्या नावलौकिकसाठी हा प्रकार केल्याचा आरोप समितीने केली असून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
मीरा भाईंदर मेट्रो ९ चे काम सुरु असून येथील स्वातंत्र्य वीर सावरकर चौक येथील मेट्रो स्थानकास मेडतीया नगर असे नाव एमएमआरडीए ने दिले आहे. वास्तविक ह्या ठिकाणी आधी पासूनच महापालिकेने स्वातंत्र्य वीर सावरकर चौक असे ह्या मुख्य चौकास नाव दिलेले आहे. आणि त्या ठिकाणी होणाऱ्या मेट्रो स्थानकास मात्र एमएमआरडीएने स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नाव डावलून जाणीवपूर्वक मेडतीया नगर असे नाव दिल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला आहे.
स्वातंत्र्य वीर सावरकर चौक शिवाय सर्वोदय संकुल, गोल्डन नेस्ट संकुल हि परिसरातील प्रचलित नावे देखील आहेत. मात्र एमएमआरडीएने मेडतिया बिल्डरचे प्रचलित नसलेले मेडतीया नगर हे नाव मेट्रो स्थानकास देण्याचा कोणता अर्थपूर्ण शहाणपणा साधला? ह्याची चौकशी करण्याची मागणी देखील देशमुख यांनी केली.
देशमुख, उपाध्यक्ष प्रमोद पार्टे, सरचिटणीस कृष्णा जाधव शहर अध्यक्ष सचिन घरत, सचिव सिद्धेश पाटील, दीपेश सरोदे, प्रतीक सुर्वे, संतोष पाटील आदींच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मेट्रो प्रशासनाला निवेदन देऊन मेडतीया नगर रद्द करून "सेनापती कानोजी आंग्रे" किंवा "स्वातंत्र्यवीर सावरकर" असे नाव देण्याची मागणी केली आहे.
मराठा साम्राज्य आरमार प्रमुख शूर सेनापती कान्होजी आंग्रे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रकार्य, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि मराठी अस्मिता लक्षात घेता त्यांच्या पैकी एक नाव सदर मेट्रो स्थानकास द्यावे असे शिष्टमंडळाने एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता सचिन कोठावळे यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले आहे.