ठाणे : मराठा आरक्षणआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आंदोलकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांनी तपासणीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ठाण्याच्या आनंदनगर चेक नाक्यावर मंगळवारी (२ सप्टेंबर) सकाळपासून आंदोलकांच्या गाड्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू असल्यामुळे मुंबईकडे कामानिमित्त निघालेल्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठाण्याच्या वेशीवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असून, ठाणे–मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अनेक चाकरमानी वेळेवर कार्यालयांमध्ये पोहोचू शकले नाहीत.
पोलिसांच्या आदेशानुसार आंदोलकांची ओळख पटवून त्यांना मुंबईकडे जाण्यापासून रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला असून सकाळच्या गर्दीच्या वेळी ठाण्यातील मुख्य रस्त्यांवर गोंधळाची परिस्थिती दिसून आली.