उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा अटकेत; समाजमाध्यमांवर शिवीगाळ, मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 07:19 IST2025-01-07T07:18:52+5:302025-01-07T07:19:39+5:30
हितेश प्रकाश धेंडे याने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली होती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा अटकेत; समाजमाध्यमांवर शिवीगाळ, मारण्याची धमकी
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज माध्यमांवर शिवीगाळ करत मारण्याची धमकी देणाऱ्या हितेश प्रकाश धेंडे (२६) याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी साेमवारी दिली. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाने धेंडेला मारहाण केल्यानंतर ‘हम एकनाथ शिंदेजी के आदमी है’ असे सुनावल्यामुळे आपण ही धमकी दिल्याची कबुली त्याने दिली.
रविवारी हितेश याने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली. यामध्ये त्याने शिंदे यांना शिवीगाळ करत ठार मारण्याचीही धमकी दिली. ही चित्रफित प्रसारित होताच, ठाण्यात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. वागळे इस्टेट भागातील शिंदेसेनेचे पदाधिकारी परेश चाळके यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलिस ठाण्यात शिंदे यांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी हितेशविरोधात गुन्हा दाखल केला. हितेश हा वागळे इस्टेट येथील वारलीपाडा भागात वास्तव्याला आहे. हा परिसर शिंदे यांच्याच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात येतो. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली.
पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची
- हितेशचे नववीपर्यंत शिक्षण झाले. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आई धुणी-भांडी करण्याचे काम करते.
- त्याच्याकडे माेबाइलही नसल्यामुळे त्याने मित्राचा माेबाइल काॅल करण्याच्या बहाण्याने रविवारी घेतला. त्यावरच स्वत:चे इन्स्टाग्राम खाते सुरू केले. त्याच खात्यावर त्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांना शिवीगाळ करत मारण्याचीही धमकी दिल्याचे तपासात उघड झाले.