भिवंडीत बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्यास अटक: एक काेटी ४७ लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त
By जितेंद्र कालेकर | Updated: January 30, 2026 21:25 IST2026-01-30T21:25:02+5:302026-01-30T21:25:20+5:30
ट्रकमध्ये 'ऑटोमोबाईल पार्टस'च्या नावाखाली सुरू होती तस्करी: राज्य उत्पादनच्या भरारी पथकाची कारवाई

भिवंडीत बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्यास अटक: एक काेटी ४७ लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त
- जितेंद्र कालेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने नाशिक-मुंबई हायवेवर एका मोठ्या कारवाईत बनावट परराज्यातील बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या ट्रकचालक श्रवणकुमार कृष्णराम पंवार (वय २९, रा. जालौर, राजस्थान) याला अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी शुक्रवारी दिली. त्याच्या ताब्यातून एक काेटी ४७ लाखांच्या मद्यासह एक कोटी ७२ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नाशिक-मुंबई हायवेवरून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या काेकण विभागीय भरारी पथकाचे
निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. त्याच आधारे उपआयुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जानेवारी २०२६ रोजी नाशिक-मुंबई महामार्गावरील सोनाळेगाव येथील एच. पी. पेट्रोलपंपाजवळ सापळा रचून सहाचाकी ट्रकमधून तस्करी करणाऱ्या श्रवणकुमार याला अटक केली.
ऑटोमोबाईल पार्टसचा बनाव फसला-
भरारी पथकाने ट्रकचालकाकडे केलेल्या चाैकशीमध्ये ट्रकमध्ये 'ऑटोमोबाईल पार्टस' असल्याचे गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. संशय बळावल्याने ट्रकची सखोल तपासणी केली. ट्रकचा मागील दरवाजा उघडला असता, आत खाकी रंगाचे अनेक बॉक्स आढळून आले. ते उघडल्यानंतर त्यामध्ये गोवा राज्यात निर्मिती असलेल्या नामांकित ब्रँडचे १८० मिली क्षमतेच्या एकूण ६७,२०० बाटल्याचे १४०० बॉक्स सापडले. या मद्यसाठ्यावर कोणताही बॅच नंबर किंवा किंमतीचा उल्लेख नव्हता.
या कारवाईत पथकाने एक काेटी ४७ लाखांचे मद्य, २५ लाखांचा ट्रक आणि दहा हजारांचा माेबाईल असा एक काेटी ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी ट्रकचालक श्रवणकुमार याच्याविरुद्ध त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक रिकेश दांगट, व्हि. व्हि. सकपाळ, एच. बी. यादव, सहायक दुय्यम निरीक्षक महाबोर कोळेकर आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.