Vidhan Sabha 2019: युतीत ‘ठाणे शहर’ने टाकलाय बिब्बा, इच्छुकांची भाऊगर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:47 IST2019-09-24T23:47:24+5:302019-09-24T23:47:56+5:30
युतीची घोषणा होत नसल्याने कार्यकर्त्यांच्या मनातील घालमेल वाढत असताना शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केली आहे तर भाजपातही शतप्रतिशतची चाचपणी करीत आहे

Vidhan Sabha 2019: युतीत ‘ठाणे शहर’ने टाकलाय बिब्बा, इच्छुकांची भाऊगर्दी
- अजित मांडके
ठाणे : युतीची घोषणा होत नसल्याने कार्यकर्त्यांच्या मनातील घालमेल वाढत असताना शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केली आहे तर भाजपातही शतप्रतिशतची चाचपणी करीत आहे. लोकसभेत मिळालेल्या यशामुळे पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली असून ठाण्यातून उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी वरिष्ठ नेत्यांकडे जोडे झिजवण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर तिकीट मिळावे म्हणून आपल्या पत्नीकरवी नेतृत्वाला विनंती केल्याची माहिती आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ मिळावा यासाठी शिवसेनेची धडपड सुरु असली व युतीच्या वाटाघाटीत या मतदारसंघाने तिढा निर्माण केल्याचे बोलले जात असून भाजप कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहर सोडणार नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. अद्याप युतीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. वरिष्ठ नेते युती होणार असल्याचे सांगत असले तरी ती होऊ नये म्हणून शिवसेना आणि भाजपमधील इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. शिवसेना-भाजपमध्ये अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. काहींनी सोशल मीडियावर प्रचारही सुरू केला आहे, काहींनी तिकीट आपल्यालाच मिळणार असा थेट दावा केला आहे. यंदा लोकसभेत आपापल्या विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या यशात आपलाच कसा सिंहाचा वाटा आहे व आपणच तिकीट मिळण्यास कसे लायक आहोत हे नेत्यांना पटवून देण्याकरिता वरिष्ठांकडे घिरट्या घालण्यास काहींनी सुरुवात केली आहे. मोदी लाटेमुळे काहीजण कसेबसे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र, असे असतांनाही त्यांना आतापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत.
यासाठी काही जण आशिष शेलार, काही थेट मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असलेल्या नेत्याला मध्यस्थी करायला भाग पाडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठाण्यात त्यांच्याच पक्षाचा विद्यमान आमदार असतांनाही त्याठिकाणीही काही इच्छुकांनी दावा केला आहे. एका इच्छुकाने आपल्याला तिकीट मिळावे यासाठी आपल्या पत्नींकरवी भाजपच्या एका नेत्याकडे विनंती केली असल्याची माहिती आहे.
शिवसेनेने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून तो मिळावा यासाठी वरिष्ठांकडून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिकांकडूनही या मतदारसंघासाठी दबाव टाकला जात आहे. परंतु, प्रत्येक महापालिका क्षेत्रात एक आमदार असावा असे भाजपचे धोरण असल्याने ते हा मतदारसंघ शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.