Vidhan sabha 2019 : कलानी कुटुंबाला राष्ट्रवादीचा पडला विसर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:45 AM2019-09-30T00:45:27+5:302019-09-30T00:45:55+5:30

ज्या पक्षामुळे आपल्याला विविध पदे भूषविता आली त्याच पक्षाला खास करून अडचणीच्या काळात सोडून जाणे कितपत योग आहे असा सवाल कलानी कुटुंबाला विचारला जात आहे.

Maharashtra Vidhan sabha 2019: The Kalani family forgot about the NCP | Vidhan sabha 2019 : कलानी कुटुंबाला राष्ट्रवादीचा पडला विसर

Vidhan sabha 2019 : कलानी कुटुंबाला राष्ट्रवादीचा पडला विसर

Next

- सदानंद नाईक 

ज्या पक्षामुळे आपल्याला विविध पदे भूषविता आली त्याच पक्षाला खास करून अडचणीच्या काळात सोडून जाणे कितपत योग आहे असा सवाल कलानी कुटुंबाला विचारला जात आहे. केवळ सत्तेत टिकण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केली. ज्या भाजप नेत्याने राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर सडकून टीका केली होती त्याच भाजपने आज तत्त्वाला बाजूला सारले आहे.

वेळी राज्यात नव्हेतर देशात माजी आमदार पप्पू कलानी यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते त्यावेळी शरद पवार यांनी कलानी कुटुंबाला आधार दिल्याने त्यांची प्रचंड बदनामी झाली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत शरद पवार व पप्पू कलानी यांची दोस्ती काढला होती. तसेच विमानातून सहप्रवासी म्हणून गुन्हेगारांना नेणाऱ्यांना मतदान करणार का? असा प्रश्न मुंडे यांनी प्रत्येक सभेत विचारला होता. दरम्यान, पप्पू यांचा मुलगा ओमी व सून पंचम भाजपच्या वाटेवर असून त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीत अडथळा नको म्हणून आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन मुलासोबत राहणे पसंत केल्याचे बोलले जात आहे.
रक्तरंजित राजकारणामुळे पप्पू कलानी यांच्यावर खुनासह इतर गुन्हे दाखल झाल्यावर त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला. १९९३ नंतर कलानी यांची रवानगी तुरूंगात झाल्यावर शहरातील गुन्हेगारी संपुष्टात येऊन कलानीराज संपल्याची आवई उठविण्यात आली. मात्र नागरिकांवर कलानी यांचे अधिराज्य कायम होते. सलग दोन वेळा जेलमधून आमदारपदी कलानी निवडून आले. त्यावेळीही कलानी कुटुंबासमवेत शरद पवार होते. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर कलानी कुटुंबाला उभारी देण्यासाठी पक्षाचे तत्कालिन शहराध्यक्ष आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यायला सांगून ज्योती कलानी यांची शहराध्यक्षपदी निवड केली.
ज्योती कलानी यांच्याकडे शहराची सूत्रे दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढविली. कलानी तुरूंगातून बाहेर आल्यानंतर पोलिसांनी उल्हासनगरमध्ये येण्यास त्यांना बंदी घातली. तेव्हा कलानी यांना दिलासा देण्याचे काम पवार यांनी पडद्यामागे केले, अशी ओरड भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी करून कलानी कुटुंबावर आरोप केले. २००२ मध्ये महापालिकेत ज्योती कलानी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ४८ नगरसेवक निवडून आले. त्यादरम्यान कलानी यांचे कट्टर समर्थक साई बलराम, जीवन इदनानी, मोहन गाडो, किशोर वनवारी, विनोद ठाकूर आदींनी कलानी यांच्यापासून फारकत घेऊन स्थानिक पक्षाची स्थापना केली. या प्रकाराने कलानी यांचा प्रभाव शहरातून कमी
झाला.
पप्पू यांचे कट्टर समर्थक त्यांना सोडून गेल्यावर कलानी कुटुंब महापालिकेच्या सत्तेबाहेर फेकले गेले. तर महापालिकेत भाजप, शिवसेना, साई व रिपाइंची सत्ता गेली १० वर्ष राहिली.पप्पू यांना इंदर भटीजा हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर त्यांना तुरूंगात जावे लागले. २०१४ च्या मोदी लाटेत ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आल्या. या प्रकराने पुन्हा कलानीराज शहरात परत आल्याचे बोलले गेले.
महापालिका सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप विरोधात वातावरण निर्माण झाले. हे ओळखून शहर भाजपने परांपरागत मित्र शिवसेनेला महापालिका निवडणुकीत बाजूला सारून ओमी कलानी टीम सोबत आघाडी केली. तसेच भविष्यात कलानी कुटुंबाकडून दगाफटका नको म्हणून ओमी टीमच्या समर्थकांना भाजपच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरविले. भाजपने ओमी टीम व साई पक्षाच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापन करून महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी यांना निवडून आणले. पण त्याचवेळी सव्वा वर्षे महापौरपद ओमी टीमला देण्याचे ठरल्याने पंचम कलानी महापौर झाल्या. मात्र त्यासाठीही ओमी टीमला बराच संघर्ष करावा लागला होता.
मुलगा व सूनेला भाजपने पाठिंबा दिल्यामुळे ज्योती कलानी यांनी एकाच घरात दोन पक्ष नको अशी भूमिका घेत भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. राष्ट्रवादी पक्ष अडचणीत असताना शहरजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. महापौर पंचम अथवा ओमी यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांचा वरदहस्त
राहणार का?
शरद पवार यांचा वरदहस्त असल्याने, कलानी कुटुंब राजकारणात टिकून आहे अशी चर्चा आहे. मात्र पवार यांच्या अडचणीच्यावेळी ज्योती कलानी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे कितपत योग्य? असा प्रश्नही विचारला जात आहे. कुमार आयलानी उमेदवारीचे मुख्य दावेदार आहेत. आयलानी ऐवजी कलानी कुटुंबातील एका सदस्याला उमेदवारी दिल्यास, पक्षातील वाद उफाळू शकतो. यातूनच कलानी कुटुंबाचे तिकीट कापले गेले तर, कलानी कुटुंबाचा राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे ठाकणार आहे.

नेमकी उमेदवारी कुणाच्या
गळ््यात पडणार?
ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार कुमार आयलानी हे प्रमुख दावेदार असले तरी ओमी कलानी, त्यांची पत्नी पंचम यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहे. कलानी- आयलानी यांच्यातील वाद जुना असून कलानी यांना जवळ करू नये अशी भूमिका आयलानी सातत्याने पक्षाकडे मांडत आहेत.

नवे नेतृत्त्व देणार पक्षाला उभारणारी
ज्योती कलानी यांनी शहराध्यक्षपदाचा शुक्रवारी दुपारी राजीनामा दिल्यावर, पक्षाचे निरीक्षक सुधाकर बढे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन शहर कार्यकारिणी जाहीर केली. हा प्रकार कलानी यांना धडा शिकविणारा आहे. एकूणच राष्ट्रवादीनेही कलानी कुटुंबाच्या डोक्यावरून हात काढल्याने, कलानी कुटुंबाची पुढील वाटचाल कशी असेल. भाजपला कालानी कुटूंब जवळचे वाटणार का? आदी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कलानी यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने आता कंबर कसली असून भविष्यात राजकारण तापणार हे नक्की.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019: The Kalani family forgot about the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.