आव्हाड करतात ‘ध’ चा ‘मा’; अजित पवार गटाकडून निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:57 IST2024-02-06T11:57:08+5:302024-02-06T11:57:24+5:30
अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान करा, अशा अर्थाचे वक्तव्य केले होते.

आव्हाड करतात ‘ध’ चा ‘मा’; अजित पवार गटाकडून निशाणा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाराष्ट्राच्या विकासाकरिता ३५ वर्षे समर्पित असलेल्या अजित पवार यांच्यावर टीका करून अर्थाचा अनर्थ करण्याचा आपला स्थायीभाव असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा दाखवून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी सोमवारी केला.
अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान करा, अशा अर्थाचे वक्तव्य केले होते. पण अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव असलेल्या आव्हाड यांनी, शरद पवार यांच्याबाबत विपरीत विधान करून, ‘ध’ चा ‘मा’ करत, खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी कृषिमंत्री म्हणून देशात केलेल्या कार्याचे कौतुक आहेच. त्याचबरोबर गेली ३५ वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या अजित पवार यांना २८८ मतदारसंघातील लोकांमध्ये आदराची भावना कायम आहे, असे ते म्हणाले.