गीतकार आशिष शिंदे यांची स्कॉर्पिओ अज्ञाताने पेटवली; भीषण आगीत दोन गाड्या जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 10:21 IST2026-03-05T10:16:41+5:302026-03-05T10:21:51+5:30
'पाखरा आझाद केलं तुला' या लोकप्रिय गाण्याचे गीतकार आशिष शिंदे यांच्या गाडीला अज्ञाताने आग लावल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील कशेळी परिसरात घडली आहे.

गीतकार आशिष शिंदे यांची स्कॉर्पिओ अज्ञाताने पेटवली; भीषण आगीत दोन गाड्या जळून खाक
भिवंडी-'पाखरा आझाद केलं तुला' या लोकप्रिय गाण्याचे गीतकार आशिष शिंदे यांच्या गाडीला अज्ञाताने आग लावल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील कशेळी परिसरात घडली आहे. या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, शिंदे यांच्या स्कॉर्पिओसह शेजारी उभी असलेली दुसरी एक गाडीही जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष शिंदे यांचे चालक प्रतीक कांबळे यांनी त्यांची स्कॉर्पिओ गाडी कशेळी येथील रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. रात्रीच्या सुमारास एका अज्ञात इसमाने या गाडीला आग लावली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले आणि स्कॉर्पिओचा कोळसा झाला. ही आग शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका वाहनापर्यंतही पोहोचली, यामुळे दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.
घातपाताचा संशय?
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की जुन्या वादातून कोणीतरी जाणीवपूर्वक लावली, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
कोण आहेत आशिष शिंदे?
आशिष शिंदे हे मराठी संगीत क्षेत्रातील एक नावजलेले गीतकार आहेत. त्यांचे 'पाखरा आझाद केलं तुला' हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड गाजले होते.