Chandra Grahan 2025: येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:32 IST2025-09-01T14:38:50+5:302025-09-03T10:32:11+5:30
Chandra Grahan 2025 Time in India: येत्या रविवार, ७ सप्टेंबर रोजी होणारे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे.

Chandra Grahan 2025: येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
ठाणे: यंदाचे भाद्रपद पौर्णिमेचे खग्रास चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) खगोलप्रेमींसाठी एक खास पर्वणी घेऊन येत आहे. येत्या रविवार, ७ सप्टेंबर रोजी होणारे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.
ग्रहणाची वेळ आणि स्वरूप
रविवारी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ग्रहणास सुरुवात होईल. त्यानंतर रात्री ११ ते १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती दिसेल. या वेळी पौर्णिमेचा तेजस्वी चंद्र लालसर किंवा तपकिरी रंगाचा दिसेल, जे एक विलोभनीय दृश्य असेल. रात्री १२ वाजून २३ मिनिटांनी ग्रहण सुटण्यास सुरुवात होईल आणि उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी ते पूर्णपणे संपेल. हे चंद्रग्रहण कोणत्याही प्रकारच्या उपकरणांशिवाय, थेट डोळ्यांनी पाहता येणार आहे.
जगभरातून दिसणार ग्रहण
हे खग्रास चंद्रग्रहण केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधूनही पाहता येणार आहे. खगोलशास्त्र अभ्यासकांसाठी आणि सामान्य लोकांसाठीही ही एक दुर्मिळ संधी आहे. यानंतरचे पुढील चंद्रग्रहण थेट ३ मार्च २०२६ रोजी होईल, असेही सोमण यांनी सांगितले. या खगोलीय घटनेचा अनुभव घेण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. सगळ्यांनाच हा 'लाल चंद्र' पाहण्याची उत्सुकता आहे.