लोकमत साहित्य महोत्सवातून मराठी संस्कृतीला प्रोत्साहन, लेखकांना उमेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 08:08 IST2026-03-23T08:08:02+5:302026-03-23T08:08:31+5:30
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे गौरवोद्गार

लोकमत साहित्य महोत्सवातून मराठी संस्कृतीला प्रोत्साहन, लेखकांना उमेद
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :मराठी साहित्य, संस्कृतीचा प्रसार तसेच सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक जतन आणि प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकमत’ने प्रभावी व्यासपीठ निर्माण केले आहे. लोकमत साहित्य महोत्सव मराठी माणसाला समृद्ध करणारा आहे. ‘लोकमत’चे साहित्य पुरस्कार लेखक आणि प्रकाशकांना नवी उमेद देणारे आहेत, असे गौरवोद्गार ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काढले.
ठाण्यातील कोरम मॉल येथे आयोजित लोकमत साहित्य महोत्सवात रविवारी झालेल्या सखी कलामहोत्सवातील विजेत्या महिलांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महामुंबईत ठाण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी साहित्य महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी ‘लोकमत’चे विशेष कौतुक केले.
पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. ठाण्यात मंगळवारी होणारा लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा आपल्याला अधिक समृद्ध करणारा असेल, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. पांचाळ म्हणाले की, ठाण्यात येऊन मला पाच ते सहा महिने झाले आहे. मी मूळचा लातूरचा आहे. लातूरपासूनच माझे ‘लोकमत’शी नाते आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून देश-विदेशातील घडामोडींसह महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवाह लोकांपर्यंत पोहोचतात.
तसेच महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीही ‘लोकमत’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ‘लोकमत सखी’च्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्यासाठी व स्वतःला व्यक्त करण्यासाठी संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे ग्रंथसंग्रहालयाचे रूपडे पालटणार
ठाणे जिल्हा नियोजन समितीमार्फत दीड कोटी निधी ठाणे ग्रंथसंग्रहालयाला दिला आहे. ग्रंथालयाचे आधुनिकीकरण, डिजिटल वाचनालय आणि पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन व लाेकांना अद्ययावत सुविधा देण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. पांचाळ यांनी स्पष्ट केले.
मराठी कलाकारांकडून महिलांचे कौतुक : सखी कला महोत्सवातून ‘लोकमत सखी’तील महिलांना व्यासपीठ मिळाले. त्यांनी कविता सादर केल्या. गायन, नऊवारी साज रॅम्पवॉक झाला. मुलांनी विविध वेशभूषा सादर केली. यावेळी, सुपर डुपर या आगामी मराठी चित्रपटातील अभिनेते ललित प्रभाकर, अभिनेत्री विदुला चौगुले आणि अभिनेत्री प्रतीक्षा कोटे उपस्थित होत्या. त्यांनी विजेत्या महिलांचे कौतुक केले.