Lockdown again in Thane, Kalyan-Dombivali: Spontaneous shops expected to close | Lockdown: ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन : उत्स्फूर्तपणे दुकाने बंद करण्याची अपेक्षा

Lockdown: ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन : उत्स्फूर्तपणे दुकाने बंद करण्याची अपेक्षा

ठाणे : कोरोनाच्या हाहाकारास शंभर दिवस पूर्ण होत असताना ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवलीत पुन्हा दहा दिवसांकरिता लॉकडाऊन केले जाणार असून याबाबतच्या आदेशात किराणा दुकाने, भाजीपाला विक्री सुरू राहणार असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात महापालिका कर्मचारी, पोलीस गल्लोगल्ली फिरून व्यापारी, भाजी विक्रेते यांनी दुकाने बंद करण्याकरिता आवाहन करीत आहेत. त्यामुळे बुधवारी आषाढीच्या दिवशी लोकांना दहा दिवसांचे धान्य व भाजीपाला खरेदी करण्याकरिता झुंबड करावी लागणार आहे.

ठाण्यातील बाळकुम, कोलशेत, ढोकाळी परिसरातील रहिवाशांनी कोरोना रोखण्याकरिता उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला असून किराणा दुकाने, भाजीपाला बंद केला आहे. अन्य ठाणेकरांनी याचेच आचरण करावे, अशी महापालिका प्रशासनाची अपेक्षा आहे. मात्र सर्वत्र हे अशक्य दिसत असल्याने सोमवारी दिवसभर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा व पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कडक लॉकडाऊनचा निर्णय झाला. पोलीस आयुक्त फणसळकर यांनी तसे टिष्ट्वट दुपारी केले. मात्र त्यानंतर अनलॉक-दोनचे वारे देशभर वाहत असताना व पुन:श्च हरीओमचा गजर सुरु असताना एवढा कडकडीत लॉकडाऊन पाळण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नापसंती व्यक्त केली. त्यामुळे लागलीच पोलीस आयुक्तांनी आपले टिष्ट्वट मागे घेतले व कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कडक करण्याचाच विचार सुरु असल्याचे सांगून लॉकडाऊनबाबतचा गोंधळ वाढवला.

मंगळवारी पुन्हा बैठकांचा रतीब घातल्यावर महापालिका आयुक्तांनी २ जुलै ते १२ जुलै लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. राज्यातील लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत लागू असल्याने त्या आदेशाच्या अनुषंगाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील, असे आदेशात नमूद केले असले तरी प्रत्यक्षात अनेक प्रभागात महापालिका कर्मचारी व पोलीस फिरुन किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांनी परवापासून दुकाने सुरु ठेवू नका, असे आवाहन करत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या पावलावर पाऊल ठेवत सायंकाळी उशिरा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेनेही लॉकडाऊनबाबत अध्यादेश काढल्याने लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कल्याण-डोंबिवलीतही २ ते १२ जुलै यादरम्यान बंद पाळला जाणार आहे.

मीरा-भार्इंदरमध्ये आजपासून लॉकडाऊन
महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी उद्यापासून १० जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. भार्इंदर पूर्वेला नवघर पोलिसांनी मंगळवारीच दुकाने बंद करायला लावली.

अनलॉक १ नंतर नागरिकांची गर्दी वाढली. त्यातच बेकायदा भाजीबाजार भरणे सुरूच आहे. व्यायामाच्या नावाखाली नागरिक सकाळी फिरायला लांब जातात. विनाकारण फिरणारेही कमी नाहीत. त्यातच मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे हे नित्याचेच झाले आहे. परिणामी शहरात सोमवारपर्यंत ३ हजार १६५ रुग्ण तर १४२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. परंतु बेजबाबदार नागरिकांमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची मागणी होत होती. आयुक्तांनीही १ जुलै रोजी सायंकाळी ५ पासून १० जुलैच्या रात्री १२ पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठीच बाहेर पडता येणार आहे.

आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात अन्नधान्य, दुकाने, बेकरी, भाज्या, फळे आदींची दुकाने व विक्री यावर बंदी घातली आहे. परंतु जीवनावश्यक वस्तूंची या दरम्यान सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत घरपोच सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. दूधाची डेअरी सकाळी ५ ते १० पर्यंत तर पिठाच्या गिरण्या व औषध दुकाने नियमित वेळेत सुरु राहतील. बाकी सर्व दुकाने, व्यवसाय व उद्योग बंद राहणार आहेत. कॉलसेंटर व खाजगी कार्यालयात १० टक्के कर्मचारी ठेऊन सुरु ठेवता येतील. हॉटेलमधून पार्सल सेवा सुरु राहणार आहे. नियमांचे उल्लंघन तसेच अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे.

व्यापारी, उद्योजक हवालदिल
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर अनेक व्यापारी, उद्योजक यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला होता. अनेक व्यापाऱ्यांनी नवा स्टॉक मागवला, उद्योजकांनी कच्चा माल मागवून उत्पादन सुरू केले. पुन्हा लॉकडाऊनमध्ये दुकाने, कारखाने बंद होणार असल्याने अगोदरच आर्थिकदृष्ट्या गाळात रुतलेला हा वर्ग हवालदिल झाला आहे. लॉकडाऊनचा कालावधी दर दहा दिवसांनी वाढवला तर पुन्हा व्यवसाय, उद्योगात उभे राहणे मुश्कील होईल, अशी भीती ते व्यक्त करीत आहेत.

हे राहणार सुरु
अत्यावश्यकवस्तूंची वाहतूक
बँका, एटीएम, विमा
प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमे
पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने
कृषी उत्पादनांची आयात-निर्यात

हे राहणार बंद
शहरांतर्गत बस, रिक्षा, टॅक्सी सेवा
आंतरराज्य बससेवा
व्यावसायिक आस्थापना, कारखाने, गोदामे

Web Title: Lockdown again in Thane, Kalyan-Dombivali: Spontaneous shops expected to close

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.