लोकल प्रवासबंदी पडली वाहनविक्रेत्यांच्या पथ्थ्यावर, सवलतींमुळे वाढली विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:16 IST2020-10-26T02:36:24+5:302020-10-26T07:16:51+5:30
Thane News : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागले होते. सलग तीन महिने कडक लॉकडाऊन राहिल्याने याचा फटका बहुतांश व्यवसायांना बसला. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अनलॉकमुळे व्यावसायिकांना काहिसा दिलासा मिळाला.

लोकल प्रवासबंदी पडली वाहनविक्रेत्यांच्या पथ्थ्यावर, सवलतींमुळे वाढली विक्री
डोंबिवली : कोरोनाच्या प्रादुर्भावात अनेक व्यवसायांना फटका बसला असताना वाहनविक्रेत्यांना अनलॉकमध्ये अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रवासबंदीमुळे अनलॉकमध्ये वाहनांच्या खरेदीला अधिक पंसती मिळाली. अद्यापही काही जणांना ही बंधने कायम असल्याने दस-याच्या मुहुर्तावर वाहनखरेदीला पसंती दिली.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागले होते. सलग तीन महिने कडक लॉकडाऊन राहिल्याने याचा फटका बहुतांश व्यवसायांना बसला. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अनलॉकमुळे व्यावसायिकांना काहिसा दिलासा मिळाला. वाहनविक्रेत्यांचा आढावा घेता गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया या सणांमध्ये लॉकडाऊन लागू असल्याने वाहनविक्री करता आली नाही. यात विक्रेत्यांना मोठे नुकसान सहन करावे
लागले. परंतु, अनलॉकपासून वेळेचे बंधन घालून व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली.
वाहनविक्रेत्यानीही आपले व्यवसाय सुरू केले. सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास बंद असल्याने चाकरमान्यांना स्वत:चे वाहन असणे गरजेच वाटले. चत्यामुळे अनलॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून वाहनांची खरेदी झाल्याचे व्यावसायिक सांगतात. गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया या सणांना झालेला तोटा अनलॉकमध्ये भरून काढल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आले. कोरोनामुळे यंदाच्या दस-याला वाहनखरेदी फारशी होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु, अद्याप रेल्वेसेवा सर्वांसाठी खुली न झाल्याने ही अपेक्षा फोल ठरली आहे. दस-याच्या मुहुर्तावर वाहनखरेदीसाठी
वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी झाली होती.