शाडूच्या मातीचा करूया पुनर्वापर, यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यात पर्यावरणपुरक उपक्रम
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 1, 2022 20:29 IST2022-09-01T20:28:09+5:302022-09-01T20:29:04+5:30
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे ठाणेकर वळू लागले आहेत. अनेक जण सोसायटीच्या आवारात किंवा घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर देत आहेत.

शाडूच्या मातीचा करूया पुनर्वापर, यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यात पर्यावरणपुरक उपक्रम
ठाणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी दरवर्षी वैयक्तीक स्तरावर किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. यावर्षी अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम ठाण्यात राबविला जात आहे. पुनरावर्तन या उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीचा पुनर्वापर केला जाणार आहे. ही शाडूची माती गणेश भक्तांकडून संकलित करून ती मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे ठाणेकर वळू लागले आहेत. अनेक जण सोसायटीच्या आवारात किंवा घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर देत आहेत. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर अनेकदा त्या मातीचे काय करायचे हा गणेशभक्तांसमोर प्रश्न उभा राहतो. परंतू पुनरावर्तन या उपक्रमाने त्याचे उत्तर शोधले आहे. ही माती गणेशभक्तांकडून संकलित करुन ती गणेशमूर्ती बनविणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे जेणेकरुन शाडूच्या मातीचा पुनर्वापर करण्याची साखळी ही सुरू राहील. घरी विसर्जन करा, गोळा करा, माती सुकवा आणि तिचा पुनर्वापर करा, असा संदेश पुनरावर्तनने दिला आहे. एमईईच्या संस्थापिका श्रीलता मेनन यांनी ठाण्यातील जबाबदारी स्वीकारली आहे.
पर्यावरण साखळी पूर्ण करा आणि पुनरावर्तन मोहिमेमध्ये सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी ठाण्यातील गणेशभक्तांना केले आहे. ही माती स्विकारण्यासाठी चार केंद्रे उभारण्यात आली आहेत. अंजना देवस्थेळे (९०८२३३३६३३) १००१ नक्षत्र रेसिडेन्सी, उदयनगर, पाचपाखाडी, ठाणे या ठिकाणी ५ ते १२ सप्टेंबर, श्रीलता मेनन (९६१९५५२२२१) १०३, टॉवर ए, व्हीराज गार्डन व्हॅली, कोलशेत रोड, ठाणे (प.). संजीवनी भागवत (८८७९८३४४४६) ६०४ ए, रोझवुड, प्रेस्टीज रेसिडेन्सी, घोडबंर रोड, ठाणे (प.). श्रीलता मेनन, विशाल शिंदे (९६१९५५२२२१, ७९७७४७२४८६) एव्हरेस्ट वर्ल्ड सर्कल, ढोकाळी पाडा, ढोकाळी, ठाणे (प.). या पत्त्यावर गणेशभक्तांनी शाडूची माती आणून देण्याचे आवाहन केले आहे.
१. शाडू माती एक मर्यादीत संसाधन आहे
२. या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो
३. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होतो
४. नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो
५. शाडू मातीचा पुनर्वापर करता येऊ शकतो