गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 05:49 IST2025-07-03T05:48:16+5:302025-07-03T05:49:25+5:30
नगरपालिकेची एक नंबरची शाळा अत्याधुनिक सुसज्ज झाली असताना, दुसरीकडे शिवमंदिर परिसरातील शाळा क्रमांक ९ मधील विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते.

गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने नुकतीच पश्चिम भागात सर्व सुविधायुक्त प्रशस्त नगरपालिकेची शाळा उभारली, मात्र त्याचवेळी अंबरनाथ पूर्वेतील शाळेची दुरवस्था हा चर्चेचा विषय ठरली आहे. गळकी छते, ओल्या भिंती अशी परिस्थिती विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर सारत आहे.
नगरपालिकेची एक नंबरची शाळा अत्याधुनिक सुसज्ज झाली असताना, दुसरीकडे शिवमंदिर परिसरातील शाळा क्रमांक ९ मधील विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते. छतातून पावसाच्या पाण्याने भिंतींना आलेली ओल, अशा परिस्थितीत विद्यार्थी शिकतात. ही शाळा शिवगंगानगर परिसरात तयार करण्यात येणाऱ्या नवीन शाळेत स्थलांतरित करण्यात येणार होती. मात्र, या शाळेचे काम पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या शाळेतच शिकावे लागत आहे.
नव्या शाळेचे काम पूर्ण करा
अंबरनाथ नगरपालिकेने पूर्व भागात दहा कोटी रुपये मंजूर करून नवीन शाळा प्रस्तावित केली आहे. त्या शाळेचे काम सुरूही आहे. मात्र, या शैक्षणिक वर्षात शाळेचे काम पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या इमारतीमध्येच अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे नव्या शाळेच्या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण
शिवमंदिर परिसरात नगरपालिकेची नऊ नंबरची शाळा सुरू आहे. शाळेत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सोय असून, पटसंख्या १७५ आहे. तसेच, बालवर्गात २८ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
शाळेसमोर मातीचे ढिगारे
शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या मातीचे ढिगारे शाळेच्या समोर पसरले असून, चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्या तून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जावे लागते.
गेल्या महिन्यांत झाली चोरी
शाळेमध्ये मागील महिन्यात चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी लोखंडी खुर्च्या, सीसी कॅमेरा, संगणकाच्या आवश्यक वस्तू, याशिवाय अंगणवाडीतील मुलांना बसण्यासाठी आणलेल्या चटयाही पळवून नेल्या आहेत.
कल्याण - मलंग परिसरातील नेवाळी नाका परिसरातील संत सावळाराम महाराज म्हात्रे या खासगी मराठी शाळेत बुधवारी (दि. २) पावसाचे पाणी शिरले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही शाळा रस्त्याच्या जवळ आहे. या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. त्यामुळे रस्ता उंच, तर शाळेचा परिसर सखल भागात आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही.
पाऊस पडल्यावर पावसाचे पाणी शाळेत शिरते. पावसाचे सांडपाणी शाळेच्या वर्गात शिरल्याने वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शाळेत सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सांडपाणी साचत असून, त्याचा निचरा होत नाही. या प्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल सरकारी यंत्रणांकडून घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.