केडीएमसीत रंगलाय अदलाबदलीचा खेळ

By admin | Published: November 5, 2016 03:47 AM2016-11-05T03:47:25+5:302016-11-05T03:47:25+5:30

राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला अद्यापपर्यंत मुहूर्त मिळालेला नाही

KDMC's colorful swap game | केडीएमसीत रंगलाय अदलाबदलीचा खेळ

केडीएमसीत रंगलाय अदलाबदलीचा खेळ

Next

प्रशांत माने,

कल्याण- राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला अद्यापपर्यंत मुहूर्त मिळालेला नाही, त्यात दुसरीकडे फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन पुरते निष्प्रभ ठरले असताना पथकप्रमुखांच्या अदलाबदलीचा खेळ मात्र अजूनही सुरूच आहे. प्रशासनाच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या अदलाबदलीच्या खेळात मात्र ‘अतिक्रमणाचा’ मुद्दा जैसे थे राहत असल्याचे वास्तव पाहावयास मिळत आहे.
फेरीवाला अतिक्रमणाच्या मुद्यावरून महासभा असो अथवा स्थायी समितीची सभा यात सर्वपक्षीय नगरसेवक नेहमीच प्रशासनावर तोंडसूख घेताना दिसतात. लोकमतने ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून हप्तेखोरीत फेरीवाल्यांना कसे अभय मिळते, याचा गौप्यस्फोट केला होता. नगरसेवकांनी केलेल्या टिकेवर प्रशासनाकडून नेहमीच कारवाईचे तुणतुणे वाजविले जाते. मात्र ठोस अशी कृती होताना दिसत नाही. फेरीवाल्यांवर कारवाईसाठी शीघ्र कृती दलाची मदत घेऊ, याचबरोबर फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही अभिवचन खुद्द आयुक्त ई. रवींद्रन यांनी महासभेत दिले. परंतु, आजही अतिक्रमणाची स्थिती जैसे थे राहिल्याचे चित्र सर्रासपणे कल्याण-डोंबिवलीत दिसते. आॅगस्टमध्ये पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना पथकप्रमुखांची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांच्या हाती सोपविण्याचे आदेश रवींद्रन यांनी सामान्य प्रशासनाला दिले होते. परंतु, नंतर यामध्ये बदल करीत पुन्हा पथकप्रमुखांच्या हाती प्रभागातील कारवाईची धुरा सोपवण्यात आली. दरम्यान हा अदलाबदलीचा खेळ अद्यापही सुरूच आहे. पथकप्रमुखांच्या अदलाबदलीत फेरीवाल्यांचे मात्र चांगलेच फावले आहे.
डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागात हा अदलाबदलीचा खेळ नुकताच पार पडला आहे. ‘ग’ प्रभागात तर गेल्या दोन महिन्यांत तीन पथकप्रमुख बदलण्यात आले आहेत. ‘ग’ प्रभागात कार्यरत असताना ज्यांच्या कार्यक्षमतेविषयी नेहमीच लोकप्रतिनिधींची ओरड असायची त्या संजय साबळे यांना ‘फ’ प्रभागाच्या पथकप्रमुखाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
याठिकाणी असणाऱ्या संजय कुमावत यांना तडकाफडकी पदावरून बाजुला करण्यात आले होते. परंतु, याच कुमावत यांना आता ‘ग’ प्रभागाच्या पथकप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. येथील अनिल भालेराव यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
संजय कुमावत यांना गुरुवारी अचानकपणे सोपविण्यात आलेली पथकप्रमुखाची जबाबदारी चर्चेचा विषय ठरली आहे. या बदल्यांबाबत स्थानिक प्रभाग अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठांचा निर्णय असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला. या बदल्याबाबत प्रभाग अधिकारी अनभिज्ञ होते अशी सूत्रांची माहिती आहे. सातत्याने होणाऱ्या या अदलाबदली बाबत लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात? याकडे आता लक्ष लागले आहे.

Web Title: KDMC's colorful swap game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.