विद्यार्थ्याच्या अपहरणाची धमकी देत मागितले ४ लाख; स्कूलबसवाल्याचा कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:06 IST2025-10-28T10:05:57+5:302025-10-28T10:06:45+5:30
व्हॉट्सॲप क्रमांकाची माहिती मिळवून पोलिसांनी स्कूल बसवाल्याला केली अटक

विद्यार्थ्याच्या अपहरणाची धमकी देत मागितले ४ लाख; स्कूलबसवाल्याचा कारनामा
मीरा रोड : विद्यार्थ्याच्या अपहरणाची धमकी देऊन त्याच्या आईकडे ४ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या स्कूलबस मालकास काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आणखी काही पालकांना खंडणीसाठी धमकावल्याचे समोर आल्याची माहिती पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सोमवारी काशिमीरा पोलिसांनी दिली.
काशिगाव येथील सेंट जेरॉम शाळेत ९ वी इयत्तेत शिकणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाच्या आईने २४ ऑक्टोबरला काशिमीरा पोलिस ठाण्यात येऊन तक्रार केली. तिला व्हॉट्सॲप संदेश आला व त्यात तुमच्या मुलाचे अपहरण केले जाईल, अशी धमकी देत ४ लाख रुपयांची मागणी केली होती. वारंवार संदेश करतानाच मुलाचे छायाचित्रसुद्धा पाठवले होते. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तपास सुरू करत व्हॉट्सॲप क्रमांकाची माहिती मिळवून तो क्रमांक ज्याच्या नावे होता त्याला ताब्यात घेतले.
स्कूलबसवाल्याचा कारनामा
बिगारी काम करणाऱ्या त्या व्यक्तीने आपला तो नंबर बंद झाल्याने तो वापरत नाही, असे सांगितले. पोलिसांनी मुलाच्या आईकडे पुन्हा माहिती घेतली असता खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने त्यांना पाठवलेले मुलाचे छायाचित्र हे त्यांनी मुलास शाळेत सोडणाऱ्या स्कूलबस चालकास दिले होते, अशी माहिती दिली.
अनेक पालकांकडून लाखोंची मागणी
पोलिसांनी तत्काळ स्कूल बसचालक सदानंद बाबूराव पत्री (३७, रा. हरिराम सोसा. हनुमान मंदिराजवळ, महाजनवाडी, मीरारोड) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाक्यानंतर पत्री याने गुन्ह्याची कबुली दिली. आराेपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याने आणखी काही विद्यार्थ्यांच्या पालकांना धमकावून पैसे मागितल्याचे समोर आले असून, त्यानुसार पाेलिसांचा तपास सुरू आहे.