हा ब्रह्मराक्षस बाटलीबंद होणे आता अशक्यच !
By संदीप प्रधान | Updated: October 6, 2025 09:20 IST2025-10-06T09:20:17+5:302025-10-06T09:20:40+5:30
भारतासारख्या बेरोजगारांच्या देशात थोड्या पैशांकरिता ट्रोलिंग करणारे पायलीला पन्नास तयार असतात हे नेते, पक्ष यांना कळल्याने सोशल मीडिया बदनामीच्या पोस्टनी ठासून भरला.

हा ब्रह्मराक्षस बाटलीबंद होणे आता अशक्यच !
- संदीप प्रधान,
सहयाेगी संपादक
काँग्रेसचे जुने पदाधिकारी प्रकाश तथा मामा पगारे हे सोशल मीडिया उदयाला येण्यापूर्वीच्या पिढीचे गृहस्थ. सोशल मीडियावर पाहिलेली प्रत्येक गोष्ट फॉरवर्ड करायची नसते हा धडा त्यांना आता मिळाला असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतची आक्षेपार्ह पोस्ट त्यांनी फॉरवर्ड केली. ती पाहताच भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब व कार्यकर्त्यांचे पित्त खवळले व त्यांनी पगारे यांना भररस्त्यात गाठून साडी नेसवली. आता परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. एक गोष्ट निश्चित आहे की, सोशल मीडियावर परस्परांच्या बदनामीचा जो पूर आला आहे तो राजकीय, सामाजिक जीवनातील सौहार्द धुऊन टाकणारा आहे. एआय जसजसे विकसित होईल तसतसे नेत्यांचे फोटो, व्हिडीओ, आवाज यांचा वापर करून सध्या निर्माण होतोय त्यापेक्षा भयंकर बदनामीकारक, दंगल घडवणारा कन्टेंट निर्माण करण्याची क्षमता सर्वच पक्षांना, संघटनांना अल्पावधीत प्राप्त होणार आहे. परिणामी परस्परांच्या बदनामीचा भस्मासुर आता बाटलीबंद करणे अशक्य आहे.
२०१४ ची लोकसभा निवडणूक झाली त्यापूर्वी म्हणजे २०१२ पासून सोशल मीडियावरील राजकीय पोस्ट अधिक धारदार होऊ लागल्या. २०१४ मध्ये तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीला काँग्रेस हायकमांडचे मिंधे असल्याचे दाखविण्याकरिता अत्यंत हिणकस पोस्ट व्हायरल केल्या गेल्या. देशभरात ३३ लाखांहून अधिक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हा काँग्रेसविरोधी प्रचार घरोघरी पोहोचला. मामा पगारे यांनी कदाचित त्यातील काही पोस्ट पाहिल्या असतील. त्यांचे पित्त तेव्हा खवळले असेल. या आक्रमणाचा मुकाबला कसा करायचा या विचाराने ते त्रस्त झाले असतील; मात्र अल्पावधीत अन्य राजकीय पक्षांनाही सोशल मीडियाचे शस्त्र कसे परजायचे हे उमजले. मग बॉलिवूडच्या चित्रपटात असते तशी देमार हाणामारी फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, यू-ट्यूबवर सुरू झाली. नेत्यांच्या मागे ट्रोलर्सच्या टोळ्या सोडण्यात आल्या. ट्रोलर्सला नेमून दिलेल्या नेत्याने ट्वीट केले की, त्याखाली विचित्र नावाने, फोटोंसह रजिस्टर्ड अकाउंटवरून शिवराळ कमेंटचा पाऊस पडू लागला. फेसबुक लाइव्ह करताना काही नेत्यांना कमेंट पाहून पळ काढावा लागला. फेसबुकवरही धोतर फेडण्याची व लुगडी ओढण्याची स्पर्धा लागली.
भारतासारख्या बेरोजगारांच्या देशात थोड्या पैशांकरिता ट्रोलिंग करणारे पायलीला पन्नास तयार असतात हे नेते, पक्ष यांना कळल्याने सोशल मीडिया बदनामीच्या पोस्टनी ठासून भरला. सोशल मीडियाशी मुख्य धारेतील माध्यमांची स्पर्धा असल्याने वाहिन्यांनीही समाजातील गणंग गोळा करून अमुक विरुद्ध तमुक अशा भांडकुदळ जोड्यांच्या झुंजी लावल्या. मग कुणी बाइट देताना थुंकतोय, शिव्या घालतोय. कुणी कुणाच्या आई-वडिलांचा उद्धार करतोय, अशा उथळपणाला ऊत आला. यात पगारे यांचेच काय कुणाचेही माथे फिरणे स्वाभाविक आहे.
एआयचा वापर करून होणारी सोशल मीडियावरील निर्मिती हा तर महाब्रह्मराक्षस ठरणार आहे. नेत्यांचे व्हिडीओ, फोटो, आवाज याचा वापर करून पोर्नपासून दंगे भडकवणाऱ्या भाषणांचा शंभर टक्के बनावट मात्र अस्सल वाटणारा कन्टेंट तयार करता येईल. खरे आणि खोटे यातील सीमारेषा पुसली जाणार आहे. २०१४ मध्ये पेटलेली ही वात सारे काही भस्मसात केल्याखेरीज थांबणार नाही.