मुसळधार पावसात आयुक्तांकडून तुंबलेल्या ठाण्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST2021-06-10T04:26:58+5:302021-06-10T04:26:58+5:30
ठाणे : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरात बुधवारी सकाळपासून अतिवृष्टी सुरू झाली असून, बुधवारी मुसळधार पावसात महापालिका आयुक्त ...

मुसळधार पावसात आयुक्तांकडून तुंबलेल्या ठाण्याची पाहणी
ठाणे : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरात बुधवारी सकाळपासून अतिवृष्टी सुरू झाली असून, बुधवारी मुसळधार पावसात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई, तसेच पाणी साचणाऱ्या अनेक ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
९ ते १२ जून या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शहरात जोरदार पावसाला सुरू झाली आहे. गेले दोन दिवस शर्मा यांनी शहरातील नालेसफाई कामाची, तसेच सखल भाग, रस्ते दुरुस्तीच्या पाहणीस सुरुवात केली आहे. बुधवार सकाळी ११ वाजता त्यांनी पातलीपाडा येथून मुसळधार पावसात नालेसफाई, तसेच पाणी साठलेल्या ठिकाणांच्या पाहणीस सुरुवात केली.
पातलीपाडा, बटाटा कंपनी, लोढा लक्झोरिया, थिराणी शाळा, भीमनगर, विवियाना मॉल, तसेच लोढा येथील नाल्याची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक नगरसेविकांशी संवाद साधून प्रभागातील अडचणी, तसेच करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. अतिवृष्टीच्या पहिल्याच दिवशी शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही यासाठी सबमर्सिबल पंप लावून, तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, पावसामुळे वाहून आलेला कचरा तत्काळ उचलून नाल्याचे प्रवाह मोकळे करण्याच्या सूचनादेखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या दौऱ्यामध्ये स्थायी समिती सभापती संजय भोईर, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय साहाय्य समिती सभापती निशा पाटील, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा राधिका फाटक, नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओळवेकर, नगरसेविका साधना जोशी, विमल भोईर, कविता पाटील, उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर उपस्थित होते.