उल्हासनगरात शिंदेसेनेचा कलानी पाठोपाठ साई पक्षाला दोस्तीचा हात, भाजपा गोटात चलबिचल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:23 IST2025-09-19T20:22:53+5:302025-09-19T20:23:25+5:30
या राजकीय गणितामुळे शिंदेसेना मराठी व सिंधी परिसरात भाजपा पेक्षा वरचड ठरल्याचे चित्र असून भाजपा गोटात चिंतेचे वातावरण आहे.

उल्हासनगरात शिंदेसेनेचा कलानी पाठोपाठ साई पक्षाला दोस्तीचा हात, भाजपा गोटात चलबिचल
उल्हासनगर : शिवसेना शिंदेसेनेने कलानी पाठोपाठ स्थानिक साई पक्षाला दोस्तीचा हात देऊन, गुरुवारी सायंकाळी रिजेन्सी हॉटेल मध्ये दोस्तीचा शुभारंभ झाला. या राजकीय गणितामुळे शिंदेसेना मराठी व सिंधी परिसरात भाजपा पेक्षा वरचड ठरल्याचे चित्र असून भाजपा गोटात चिंतेचे वातावरण आहे.
उल्हासनगर महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी भाजपाने, पक्ष प्रवेश जोरात सुरू केले. कलानी भाजपात जाणार की शिंदेसेनेत जाणार याची अटकले सुरू असताना, कलानी समर्थक काही माजी नगरसेवकांना भाजपने पक्ष प्रवेश देऊन, कलानी यांना टेन्शन दिले. ओमी कलानी यांनी भाजपा ऐवजी शिंदेसेने सोबत दोस्तीचा हात पुढे करून, एकत्र निवडणूक लढाविण्याच्या आणाभाका घेतल्या. त्याच वेळी साई पक्षाचे प्रमुख जिवन इदनानी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन युतीला सकारात्मक प्रतिसाद दिला. गुरुवारी सायंकाळी रिजेन्सी हॉटेल मधील सभागृहात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेना व साई पक्षाच्या दोस्तीचे सुभारंभ केले. ओमी कलानी व स्थानिक साई पक्षाचे प्रमुख जिवन इदनानी यांचे सिंधी समाज परिसरात ताकद आहे. शिंदेसेनेने कलानी पाठोपाठ स्थानिक साई पक्षाला दोस्तीचा हात दिल्याने, त्यांची राजकीय ताकद वाढली.
महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदेसेने मध्ये महायुती झाल्यास कलानी व स्थानिक साई पक्ष यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. भाजप व शिंदेसेना जे जागा देतील, त्यावर दोघांनाही समाधान व्यक्त करावे लागेल. असे राजकीय तज्ञाचे मत आहे. गुरुवारी झालेल्या दोस्तीच्या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, ओमी कलानी, जिवन इदनानी, माजी महापौर आशा इदनानी, शिंदेसेनेचे महानगरप्रमुखराजेंद्र चौधरी, शहरप्रमुख रमेश चव्हाण, राजेंद्रसिंग भुल्लर, उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन, दिलीप गायकवाड आदिजण उपस्थित होते.