ठामपाच्या 19 अधिकाऱ्यांच्या बेकायदा पदोन्नत्या केल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 12:46 AM2020-12-16T00:46:16+5:302020-12-16T00:46:32+5:30

शर्मा यांचा दणका; जयस्वाल यांनी बढती दिलेले अधिकारी मूळ पदावर

Illegal promotions of 19 Thampa officers canceled | ठामपाच्या 19 अधिकाऱ्यांच्या बेकायदा पदोन्नत्या केल्या रद्द

ठामपाच्या 19 अधिकाऱ्यांच्या बेकायदा पदोन्नत्या केल्या रद्द

googlenewsNext

ठाणे : रीतसर प्रक्रिया पूर्ण न करताच पदोन्नती दिलेल्या ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी धक्का दिला आहे. नगर अभियंत्यांपासून इतर १९ अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार काढून त्यांना त्यांच्या मूळ पदावर आणले आहे. आकृतिबंधानुसार ही कार्यवाही केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात या अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली होती.

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, शहरविकास आणि पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता यांना वरच्या पदाची खैरात आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात वाटली होती. आयुक्त डॉ. शर्मा यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेत मंजूर जागा नसतानाही केवळ संबंधित अधिकाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी त्यांच्याकडे वरिष्ठ पदाचा कार्यभार दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी गेल्या आठवड्यात नगर अभियंता असलेले रवींद्र खडताळे यांना पुन्हा उपनगर अभियंता या पदावर आणले. परंतु त्यांच्याकडे नगर अभियंतापदाचा प्रभारी पदभार तसाच ठेवला आहे. 

अर्जुन अहिरे यांच्याकडे उपनगर अभियंतापद असताना त्यांना अतिरिक्त नगर अभियंतापदाचा कार्यभार दिला होता. आता त्यांच्याकडे प्रभारी अतिरिक्त नगर अभियंतापद दिले आहे. भरत भिवापूरकर, विकास ढोले, नितीन पवार, धनंजय गोसावी, रामकृष्ण कोल्हे, रामदास शिंदे, नितीन येसुगडे आणि शैलेंद्र बेंडाळे या कार्यकारी अभियंत्यांकडे उपनगर अभियंता या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता, तो काढून त्यांना पुन्हा कार्यकारी अभियंतापदावर आणले आहे.         

शशिकांत साळुंखे, दत्तात्रेय शिंदे आणि अतुल कुलकर्णी या उपअभियंत्यांकडे कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार होता, तो काढून त्यांना पुन्हा मूळ पदावर पाठवले आहे. कनिष्ठ अभियंता असलेले सुनील जाधव, सुनील निकुंभ, मनीष भावसार, संदीप गायकवाड आणि प्रशांत कलगुटकर यांच्याकडे उपअभियंतापदाचा कार्यभार दिला होता. त्यांना पुन्हा कनिष्ठ अभियंतापदावर आणले आहे. या कार्यवाहीमुळे नाराज झालेल्या अधिकाऱ्यांकडून काम करुन घेण्याचे कसब आता प्रशासनाला दाखवावे लागणार आहे.

पदवीधर आणि पदविकाधारक अभियंत्यांमध्ये वाद 
महापालिकेत पदवीधर आणि पदविकाधारक अभियंत्यांमध्ये अनेक दिवस वाद सुरू आहे. पदविकाधारक अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पदाची खैरात केली होती. त्याची दखल घेऊन शर्मा यांनी त्यांना पदावनत करून झटका दिला आहे.
 

Web Title: Illegal promotions of 19 Thampa officers canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.