मीरा भाईंदरमध्ये बेकायदा कबुतर खाने सुरूच, दाणे विक्रेत्याकडून एकाला मारहाण
By धीरज परब | Updated: October 11, 2025 22:09 IST2025-10-11T22:09:14+5:302025-10-11T22:09:28+5:30
Mira Bhayandar News: मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या बनलेल्या बेकायदा कबुतर खान्यावर कारवाईचे आदेश देऊन देखील मीरा भाईंदर महापालिका मात्र कारवाईस टाळाटाळ करत असल्याने एका बेकायदा कबुतर खाना वर दाणे विक्रेत्याने एकास मारहाण करत चाकू घेऊन वार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे.

मीरा भाईंदरमध्ये बेकायदा कबुतर खाने सुरूच, दाणे विक्रेत्याकडून एकाला मारहाण
- धीरज परब
मीरारोड - मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या बनलेल्या बेकायदा कबुतर खान्यावर कारवाईचे आदेश देऊन देखील मीरा भाईंदर महापालिका मात्र कारवाईस टाळाटाळ करत असल्याने एका बेकायदा कबुतर खाना वर दाणे विक्रेत्याने एकास मारहाण करत चाकू घेऊन वार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे.
भाईंदर पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबडेकर मार्ग ६० फुटी रस्त्यावर गणपती मंदिर जवळ ओम श्री विनायक सोसायटी आहे. त्याच्या जवळ सार्वजनिक मुख्य रस्त्यावर बेकायदा कबुतर खाना चालवला जातो. या ठिकाणी एक विक्रेता हा दाणे विक्रीचा धंदा लावतो. त्याच्या कडून चणे आदी खाद्य घेऊन रस्त्यावरच टाकले जाते जेणे करून मोठ्या प्रमाणात रस्ता आणि परिसरात कबुतर वावरतात.
या ठिकाणी दुकाना बाहेर वाढीव प्लास्टिक छपऱ्यावर कबुतरांना पकडण्यासाठी मांजरी येतात. मांजरी कबुतरांची शिकार नेहमी करत असल्याने त्या परिसरात राहणाऱ्या चेतन दवे यांनी शनिवारी दाणे विक्रेत्यास छतावर मांजरी असून ते प्लास्टिक छत काढून टाका जेणे करून मांजरी येणार नाहीत व कबुतरांना मारणार नाहीत असे सांगितले.
त्यावरून बोलाचाली होऊन विक्रेत्याने दवे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. चाकूने दवे यांना मारण्याचा प्रयत्न केला पण ते बचावले. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी दवे यांची विक्रेत्या विरुद्ध अदखलपात्र फिर्याद नोंदवून घेतली आहे. बेकायदा कृत्य करणारे आणि लहान सहान बाबींवरून पण चाकू घेऊन हल्ला करणाऱ्या ह्या गुंडाना सरकार व पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याची खंत दवे यांनी बोलून दाखवली.
एरव्ही न्यायालयाच्या आदेशांचे कारण देऊन सोयीनुसार लोकांच्या भावना आणि लोकांच्या हिता विरोधात काम करणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेला न्यायालयाने दिलेले कबुतरखाना वर कारवाईचे आदेश, कांदळवन संरक्षण तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश मात्र दिसत नाहीत. पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आधी निलंबित करा अशी मागणी सत्यकाम फाउंडेशनचे ऍड. कृष्णा गुप्ता यांनी केली आहे.