Ignore the statue of Shivaji Maharaj; MNS tells commissioners | शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; मनसेने आयुक्तांना सुनावले खडे बोल
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; मनसेने आयुक्तांना सुनावले खडे बोल

मीरा रोड : मीरा- भाईंदर पालिकेकडून काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या देखभाल, सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष करून त्यांचा अवमान केला जात असल्याचा मनसेने निषेध करत आयुक्तांना खडे बोल सुनावले.
स्वत:ची दालने नागरिकांच्या पैशांमधून आलिशान सजवणारे महापालिका प्रशासन महापौर, उपमहापौर आदी पदाधिकाऱ्यांना मात्र काशिमीरा येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या देखभालीत स्वारस्य नाही. पुतळ्याची नियमित सफाई केली जात नाही. सणासुदीला रोषणाई, सजावट केली जात नाही. रात्रीचे अनेकवेळा दिवे बंद असल्याने पुतळा अंधारात असतो.

आजूबाजूला पानबिड्यांचे बाकडे, बार असल्याने मद्यपी, व्यसनींचा राबता असतो. पुतळ्याच्या चौकात दारुच्या बाटल्या, सिगारेटची थोटकं आदी पडलेली असतात. परंतु महापालिका मात्र सातत्याने डोळेझाक करुन महाराजांचा अवमान आणि विटंबना करत असल्याचा संताप मनसैनिकांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी मनसेचे उपशहर अध्यक्ष सचिन पोपळे यांच्यासह प्रकाश शेलार, नितीन बोंबले पाटील, विजय भगत, स्वराज कासुर्डे, महेश शिंदे, गणेश बामणे, ऋ षिकेश नलावडे, बाबूजी, सचिन शेडगे, शेरा पुरोहित, संकेत आर्डे, प्रकाश निकम, उदय सातार्डेकर, सचिन धनावडे, सचिन बोंबले- पाटील, नितीन मोहिते, सूर्या पवार, स्वप्नील गुरव, भावेश करवळ, अजय मुळे, साहिल उघडे, कुणाल करांडे, वैभव कासारे, अक्षय रकवी आदी पदाधिकारी व मनसैनिकांनी पालिका मुख्यालयात आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. आयुक्तांना लेखी निवेदन दिले.

त्यावर आयुक्तांनी अग्निशमन दलाच्या प्रभारींना फोन करून महाराजांच्या पुतळ्याची सफाई नियमित करण्याचे निर्देश दिले. तसेच या पुढे देखभाल, सुरक्षितता, सणासुदीला सजावट केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती पोपळे यांनी दिली.

युतीची सत्ता असूनही ही परिस्थिती
मीरा-भाईंदर पालिकेत युतीची सत्ता असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेतील अधिकारी, नगरसेवकांच्या दालनांवर कोट्यवधींचा खर्च केला जात असताना पुतळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कारभाराच्या नावाने बोटे मोडली आहेत. अधिकाऱ्यांनी तातडीने यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Web Title: Ignore the statue of Shivaji Maharaj; MNS tells commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.