'शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकावल्यास हात छाटू'; वामन म्हात्रेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:20 IST2025-10-30T10:18:17+5:302025-10-30T10:20:10+5:30
बदलापूर शहरात भाजप आणि शिंदेसेना यांच्यात उघड संघर्ष सुरु झाला आहे

'शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकावल्यास हात छाटू'; वामन म्हात्रेंचा इशारा
बदलापूर : बदलापुरात निवडणूक प्रचाराचा स्तर दिवसेंदिवस घसरत असून, शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणी धमकावल्यास त्याचे हात छाटण्याचा इशारा दिला आहे. म्हात्रे यांच्या भाषणाची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल होताच संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
सध्या बदलापूर शहरात भाजप आणि शिंदेसेना यांच्यात उघड संघर्ष सुरु झाला आहे. आ. किसन कथोरे आणि शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वादामुळे नगरपालिका निवडणूक प्रचाराचा स्तर घसरला आहे. याआधीदेखील चुकीच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी केल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. यापूर्वीही कथोरे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका म्हात्रे यांनी केली होती. निवडणुकीतील उमेदवार आणि पदाधिकारीच थेट कायदा हातात घेण्याची भाषा करू लागल्याने बदलापूरचे राजकारण गुन्हेगारीकडे वळू लागल्याची भावना बदलापूरमधील रहिवासी बोलून दाखवत आहेत.