ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झालो : एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 09:07 IST2025-10-21T09:07:27+5:302025-10-21T09:07:57+5:30
पराभव दिसू लागल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झालो : एकनाथ शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ‘दिवाळीच्या उत्सवात ठाणे शहर जल्लोष, उत्साह आणि आनंदाने उजळून निघाले आहे. ठाणेकरांनी मला मोठे केले, मला मुख्यमंत्री बनवले, आता उपमुख्यमंत्रिपदही मिळाले. हे सगळे ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले,’ असे उद्गार उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सोमवारी काढले.
शिंदे पुढे म्हणाले की, ‘ठाणे हे सण-उत्सवांचे पंढरपूर आहे. जिकडे जावे तिकडे तरुणाईचा उत्साह, आनंद आणि समाधान दिसते. ठाणेकर हे माझं कुटुंब आहे. वर्षभर दौऱ्यांमुळे मी कितीही व्यस्त असलो तरी दिवाळी उत्सवात सहभागी होणे, हे माझ्यासाठी आनंदाचे आणि आपुलकीचे क्षण असतात.’
‘शेतकरी संकटात आहे; पण सरकारने त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. जिथे जिथे मी गेलो, तिथे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ मदतीचे काम हाती घेतले. ज्यांची जनावरे वाहून गेली, अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष गायी देण्याचे कार्य सरनाईक करत आहेत.’, असे नमूद करून शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत, असे सांगितले.’
परभावामुळेच निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा
‘गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणेकरांनी आमच्यावर विश्वास दाखवून एकहाती विजय दिला. आम्ही केलेल्या कामांची पोचपावती जनता नेहमी देते. राज ठाकरे यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, ‘पराभव दिसू लागल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करत आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली.