कल्याण-डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशाचा घोडेबाजार तेजीत, शिंदेसेना-भाजपचे एकमेकांवर पैशांच्या आमिषाचे आरोप
By अनिकेत घमंडी | Updated: December 5, 2025 10:05 IST2025-12-05T10:04:26+5:302025-12-05T10:05:15+5:30
Shinde Shiv Sena Vs BJP: भाजप महापौरपदाचे, पैशांचे आमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून २ ते ५ कोटींची ऑफर दिली जात खळबळजनक आरोप भाजपने केला आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशाचा घोडेबाजार तेजीत, शिंदेसेना-भाजपचे एकमेकांवर पैशांच्या आमिषाचे आरोप
अनिकेत घमंडी, डोंबिवली
निवडणूक आली की तिकीट किंवा उमेदवारीसाठी घोडेबाजार होतो. मात्र कल्याण-डोंबिवलीत पक्ष प्रवेशावरून घोडेबाजार तेजीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिंदेसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजप महापौरपदाचे, पैशांचे आमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. शिंदेसेनेच्या आरोपांना उत्तर देताना त्यांच्या पक्षात जाण्यासाठी २ ते ५ कोटींची ऑफर दिली जात असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दिले.
महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच दोन्ही पक्षांत विरोधी पक्षासह माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना घेण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. दर आठवड्याला दोन्ही पक्ष एकमेकांना धक्के देण्यासाठी कंबर कसून आहेत. आता मनसेचे नगरसेवक कोणाच्या गळाला लागतात याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर बुधवारी पत्रकार परिषद घेऊन घोडेबाजार कसा सुरू आहे हे सांगत आरोप-प्रत्योरापांच्या फैरी झाडल्या.
कल्याणमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे हे काय भूमिका घेतात याकडेही दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे. मात्र, करोडो रुपयांचे किंवा पदाचे आमिष दाखवून प्रवेश दिले जात असतील तर यापुढे पक्षप्रवेश करणाऱ्यांची अपेक्षा वाढणार असल्याची चर्चा आहे.
युती धर्माचे आदेश पाळणार का?
शिंदेसेनेसह भाजपकडून माजी नगरसेवकांवर गळ टाकण्यासाठी वरिष्ठ पातळीवर फोन करणे, प्रत्यक्ष भेट घेणे असे प्रकार याआधी झाले असल्याचे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र बुधवारी युती धर्म पाळण्यावरून दोन्ही पक्षनेत्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ते आदेश आणखी किती दिवस पाळले जातात हेही बघावे लागणार आहे.
प्रवेशानंतर मिळणार तरी काय? अनेकांना उत्सुकता
पक्षात येणाऱ्यांना काय मिळणार तसेच सध्या वेटिंगवर असलेल्या लोकप्रतिनिधींमध्येही कोणत्या पक्षात गेल्यास काय मिळणार याचीच चर्चा सुरू असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.