घरवापसी! एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:46 IST2025-12-03T12:45:22+5:302025-12-03T12:46:38+5:30
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करीत आहेत. पण, पक्ष सोडून लोक जाऊ लागली आहेत.

घरवापसी! एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत परतले
मुंबई / ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या, कोपरी - पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख आबा मोरे यांच्यासह सुमारे २०० कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर उद्धवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोपरीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर त्यांच्याकडे गेली अडीच ते तीन वर्षे इनकमिंग सुरू आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करीत आहेत. परंतु, आत्ता शिंदे यांना त्यांच्याच मतदारसंघात उद्धवसेनेने धक्का दिल्याचे मानले जाते.
स्थानिक माजी नगरसेवकांकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आणि गेल्या नऊ वर्षांत त्यांनी स्थानिकांचे एकही काम केले नसल्याचा आरोप कोपरीतील जुने शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी केला. आम्हाला कोपरीत आमच्याच पक्षात कोणी वाली नसल्याचे उपविभागप्रमुख आबा मोरे यांनी उद्धवसेनेत प्रवेश केल्यावर सांगितले.
मोरे हे माजी सभागृहनेते पांडुरंग पाटील यांचे खंदे समर्थक मानले जात. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी माजी खा. राजन विचारे, युवासेना कोपरी-पाचपाखाडी विधानसभा प्रमुख राजेश वायाळ आदी उपस्थित होते.
भाजपच्या दगाबाजीमुळेच मविआची स्थापना : ठाकरे
भाजपने दगाबाजी आणि विश्वासघात केल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली होती. शिवसेना काँग्रेससोबत गेली नव्हती. आमच्यावर काँग्रेससोबत गेल्याचा आरोप करणाऱ्यांच्याच पोस्टरवर आनंद दिघेंच्या फोटोशेजारी सोनिया गांधींचे फोटो झळकत आहेत.
ही मोठी विसंगती असून महायुतीत त्यांना कोणतीही किंमत नाही, अशी टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी एकत्रित २१ डिसेंबरला घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, “निवडणूक आयोग आणि न्यायालयाबद्दल न बोललेलेच बरे”, असा टोला ठाकरे यांनी लगावला.