घर खरेदीदारांचे २०० कोटी लटकले; महारेराचे आदेश कागदावरच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:08 IST2025-02-07T12:06:35+5:302025-02-07T12:08:00+5:30
मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बिल्डरांची खाती गोठवण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाल करताच बिल्डरांनी महारेराच्या आदेशानुसार भरपाई दिली.

घर खरेदीदारांचे २०० कोटी लटकले; महारेराचे आदेश कागदावरच!
ठाणे : ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांतील घर खरेदीदारांना बिल्डरांकडून नुकसान भरपाईपोटी येणे असलेली २०० कोटींहून अधिक रक्कम वसूलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून हलगर्जी सुरू आहे. यामुळे महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी दिलेले आदेश कागदावर राहिले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बिल्डरांची खाती गोठवण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाल करताच बिल्डरांनी महारेराच्या आदेशानुसार भरपाई दिली.
ठाण्यात घर खरेदीदारांचे नुकसान भरपाईचे १४३ कोटी ६७ लाख रुपये अडकले आहेत. ठाण्यातील केवळ पाच बिल्डरांकडे १०७ कोटी रुपये अडकले आहेत. ही रक्कम वसूल करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले तर ७५ टक्के रक्कम वसूल होईल.
ठाणे जिल्ह्यात ९८ प्रकल्पांत २२२ घरखरेदीदार तक्रारदारांचे १५५ कोटी ३२ लाख वसूल व्हायचे होते. यापैकी आतापर्यंत १५ प्रकल्पांत २७ घर खरेदीदारांचे केवळ ११ कोटी ६५ लाख वसूल झाले आहेत.
पालघरमध्ये बिल्डरकडे २८ कोटी थकले
पालघर जिल्ह्यात ३३ प्रकल्पांकडे ७९ जणांचे २८ कोटी १९ लाख वसूल व्हायचे आहेत. येथेही फक्त तीन बिल्डर्सकडे १२ कोटी अडकले असून ते वसूल झाल्यास ४२ टक्के वसुली होईल.
जिल्ह्यात ३९ प्रकल्पांत ८८ घरखरेदीदारांचे ३२ कोटी ७५ लाख रुपये वसूल व्हायचे होते. यापैकी सहा प्रकल्पांत नऊ घरखरेदीदारांचे चार कोटी ५६ लाख वसूल झाले.
जिल्ह्यात कर्म ब्रह्मांड अँफोरडेबल होम्स प्रा. लि. (९ कोटी २३ लाख), विनय युनिक रिअलटर्स (१ कोटी ८७लाख), शांती रिअल्टी अँड लाइफस्पेस (१ कोटी ३५ लाख) या प्रबिल्डरांच्या वसुलीकडे सौनिक यांनी लक्ष वेधले.
रायगडमध्ये ३३ प्रकल्प
रायगड जिल्ह्यात ३३ प्रकल्पांतील ६५ घरखरेदीदारांचे ३० कोटी २२ लाख रुपये वसूल व्हायचे आहेत. येथेही पाच बिल्डर्सकडे १९ कोटी अडकलेले असून ही रक्कम वसूल केल्यास एकूण रकमेच्या ६२ टक्के वसुली होणार आहे.
जिल्ह्यात १९ प्रकल्पांत ५९ खरेदीदारांचे ७ कोटी ८७ लाख वसूल झाले. तर वेदांत रिअलटर्स (२ कोटी), एक्सरबिया वराई डेव्हलपर्स प्रा. लि. (१३ कोटी ८५ लाख), एन. के. भूपेशबाबू (१कोटी), स्कायलाइन सफायर (दीड कोटी), युनिव्हर्सल बिल्डर अँड डेव्हलपर्स (७५ लाख) हे प्रमुख थकबाकीदार आहेत.
ठाण्यातील थकबाकीदार
ठाण्यात निर्मल डेव्हलपर्स (२१ कोटी १९ लाख), सेठ डेव्हलपर्स प्रा. लि. (२६ कोटी ८८ लाख), सुशीला मालगे (१८ कोटी ३० लाख), टी भिमजियानी रियलिटी प्रा. लि. (३५ कोटी १९ लाख), अँको हाऊसिंग इंडिया प्रा. लि. (सहा कोटी) या प्रमुख भरपाई थकवलेल्या बिल्डरांबाबत सौनिक यांनी २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना पत्र लिहिले.