ठाणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण; ठाणे शहरात प्रथमच कोरोनाचे शून्य रूग्ण!
By सुरेश लोखंडे | Updated: November 29, 2022 22:54 IST2022-11-29T22:53:56+5:302022-11-29T22:54:44+5:30
अडीच वर्षांत प्रथमच एकही रुग्ण नाही.

ठाणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण; ठाणे शहरात प्रथमच कोरोनाचे शून्य रूग्ण!
ठाणे : येथील महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोनाच्या गेल्या अडीच वर्षांपासून प्रथमच शून्य रुग्ण निदान मंगळवारी झाले आहे. हा कोरोनानंतरचा ऐतिहासिक क्षण नोंदवण्यात आल्याचे ठाणे सिव्हिलचे डॉ. प्रसाद भंडारी यांनी लोकमतला सांगितले.
कोरोना हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी घेतलेल्या अपरिमित परिश्रमानंतर आज आपण शून्य रुग्ण संख्येवर येऊन पोहोचलेलो आहोत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेतील फक्त प्रत्येकी एक एक नवीन रुग्ण आज आढळून आला आहे. या निदाना व्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्यातून आज एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कोरोनानंतर हे अत्यंत सकारात्मक दृष्टीने पडलेले पाऊल असल्याचे समाधान भंडारी यांनी व्यक्त केले.
आज दिवसभरात फक्त दोन रुग्ण सापडले आहेत. या व्यतिरिक्त ठाणे मनपासह उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर या महापालिकांमध्ये व अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिका आणि ग्रामीण भागात एकही रुग्ण आज सापडला नाही. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात सात लाख ४७ हजार ३१४ रुग्णांची नोंद गेल्या अडीच वर्षांच्या या कोरोना कालावधी झाली आहे. सध्या ६९ रुग्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत सात लाख ३६ हजार ४४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृत्यू आजही शुन्य नोंद असताना या कोरोना कालावधी ठाणे जिल्ह्यात ११ हजार ९६७ मृतांची नोंद घेण्यात आली आहे.