मीरारोड - भाजपाचा माजी आमदार नरेंद्र मेहतासह त्याचा साथीदार संजय थरथरेवर दाखल बलात्कार व अॅट्रॉसीटीच्या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीण पोलीसांकडेच आहे. आरोपींना पकडण्यात सपशेल अपयश आल्याने पोलीसांची भुमिका संशयाच्या भोवरायात सापडली आहे. आरोपींशी पोलीसांचे हितसंबंध असल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे. १२ दिवसांपासुन पोलीसांना सापडत नसलेले सहआरोपी संजय थरथरे याला देखील आज बुधवारी उच्च न्यायालयाने अटकेपासुन दिलासा दिला. याआधी ५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने, मुख्य आरोपी मेहता तपासात सहकार्य करत असल्यास कठोर कारवाई करु नका असे आदेश देत दिलासा दिला होता.२८ फेब्रुवारीच्या पहाटे भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केला होता. परंतु ठाणे ग्रामीण पोलीसांना १२ दिवस उलटले तरी थरथरेचा ठाव ठिकाणा लागला नव्हता. मेहता देखील पोलीसांच्या हाती न लागता ५ मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर दिलासा मिळाल्याने शहरात वावरु लागला आहे. १२ दिवसांपासुन पोलीसांना न सापडलेला सह आरोपी थरथरे याने देखील उच्च न्यायालयात दाद मगीतली असता न्यायालयाने त्याला देखील अटके पासुन दिलासा दिला आहे. दुपारी न्यायालयाने दिलासा देणारा आदेश देताच काही तासातच थरथरे महापालिका मुख्यालयात उपमहापौर हसमुख गेहलोत, भाजपा जिल्हा हेमंत म्हात्रे आदिंसह दिसुन आला. त्यामुळे थरथरे जवळपास असुनही पोलीसांना सापडला नाही हे स्पष्ट झाले आहे.वास्तविक मेहता व थरथरे यांचे ठाणे ग्रामीण पोलीसांशी हितसंबंध आहेत. पोलीसांनी अनेक प्रकरणात आरोपींना पुर्वी देखील पाठीशी घालण्याचे काम केले आहे. तक्रारींची दखल न घेणे, तक्रार असताना गुन्हा दाखल न करणे, त्यांना अटक न करणे आदी अनेक प्रकारच्या तक्रारी व आरोप नागरिकांनी केलेल्याआहेत. ठाणे ग्रामीण पोलीसांच्या वरिष्ठ अधिकारायां सोबत आरोपींचे घनिष्ठ संबंध असल्याचे अधिकारायां सोबतच्या काही व्हायरल फोटों वरुन स्पष्ट झाले आहे. मेहता वर अनेक गुन्हे दाखल असुन देखील दोन दोन कार्बाईनधारी पोलीस बंदोबस्ताला दिलेले होते. या बाबतच्या तक्रारी देखील वरिष्ठ पोलीस अधिकारायां पासुन शासन स्तरावर झालेल्या असताना कार्यवाही केली गेली नाही.आरोपी हे भाजपा नगरसेवक प्रशांत दळवीची गाडी घेऊन फिरत असल्याचे एका जागरुक नागरिकाने काढलेल्या व्हिडिओमुळे पोलीसांना माहिती मिळाली होती. नंतर पोलीसांनी दळवी यांची आलिशान एमएच ०४ जेजे ५२५२ क्रमांकाची गाडी जप्त करुन पोलीस ठाण्या बाहेर आणुन ठेवली आहे. गुन्हा दाखल केल्या नंतर पिडीत नगरसेविकेला भ्रमणध्वनी वरुन धमक्या आल्याने त्याचा सुध्दा गुन्हा मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. शासना कडुन सदर गुन्ह्याचा तपास ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुनहे शाखेचे उपायुक्त यांच्या कडे देण्याचे जाहिर केले असले तरी अजुनही अधिकृत पत्र आले नसल्याने तपास ठाणे ग्रामीण पोलीसां कडेच आहे. पण आरोपीची पोलीसांनी अजुनही चौकशी सुरु केलेली नसल्याचे सुत्रांनी सांगीतले.
नरेंद्र मेहतानंतर थरथरेलाही उच्च न्यायालयाचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 20:37 IST