ठाण्यात पावसाचा धुमाकूळ; १२ घरांचे नुकसान, शेकडो गावांचा संपर्क तुटला! कुलाब्यात १०३ मिमी नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 10:28 IST2025-09-29T10:27:33+5:302025-09-29T10:28:49+5:30
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर संततधार होती.

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ; १२ घरांचे नुकसान, शेकडो गावांचा संपर्क तुटला! कुलाब्यात १०३ मिमी नोंद
ठाणे/मुंबई : मुंबईसहठाणे जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर संततधार होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत धाले. विविध तालुक्यांमध्ये १२ घरांचे नुकसान झाले. तर शहापूर तालुक्यातील सापगाव येथे भातसा नदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे एका कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले.
संततधारामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे साडेतीन मीटरने उघडले असून, शेकडो लीटर पाणी भातसा नदीपात्रात सोडले आहे. यामुळे नदीला महापूर आला असून, तालुक्यातील सुमारे १२० गावांचा संपर्क तुटला. सापगाव, डोळखांब, किन्हवली, शेणवा व सोंडे परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. विशेषतः डोळखांब-सोंडे मार्ग आणि डोळखांब पुलावरून वाहतूक पूर्णतः बंद केली असून रायते पुलावरून उल्हास नदीच्या पुराचे पाणी वाहत असल्यामुळे कल्याण ते नगर महामार्ग बंद केला आहे.
कुलाब्यात १०३ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्याच्या सूचना मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या.
वीज पडल्याने ५ जखमी
पालघर जिल्ह्यातील नदी, ओहोळ, धरणे भरून वाहत आहेत. अनेक पूल, रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती. मासवण येथे एका घरावर वीज पडल्याने ५ जण जखमी झाले. याशिवाय झाडे कोसळून घरांची पडझड झाली. तसचे शेतीचे नुकसान झाले आहे.
आठव्यांदा तीन नंबरचा बावटा; जलवाहतूक पुन्हा कोलमडली
उरण : वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांत सलग आठव्यांदा बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मासेमारीसह गेटवे-एलिफंटा, गेटवे-जेएनपीए, गेटवे-मांडवा, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस ही प्रवासी जलवाहतूक शनिवारपासूनच (ता. २७) पुन्हा एकदा ठप्प झाली असून, मच्छीमारांनी आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली आहे. करंजा बंदरातील सुमारे ४०० बोटींनी नांगर टाकल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली. खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया-एलिफंटा, गेटवे-जेएनपीए, गेटवे-मांडवा सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शनिवारपासूनच बंद केल्याचे गेटवे मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव इक्बाल मुकादम यांनी सांगितले. तर, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवसदरम्यानची सागरी प्रवासी वाहतूकही शनिवारपासूनच बंद करण्यात आली असल्याची माहिती भाऊचा धक्का येथील बंदर विभागाचे निरीक्षक सुशील साटेलकर यांनी दिली.
भातसा नदीला आला पूर; ग्रामस्थांना आवाहन
भातसा नदीला पूर आल्यामुळे सापगावजवळ नदीने २०० मीटर पातळी गाठल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. सापगाव येथे आ. दौलत दरोडा यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी नागरिकांना दिलासा देताना, ‘कोणालाही निवास समस्या असल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा,’ असे आवाहन केले.
एक जण गेला वाहून
ठाणे जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी किंवा पशुधनाचे नुकसान झाल्याची नोंद नाही. बदलापूरमध्ये शनिवारी रात्री एक व्यक्ती वाहून गेला. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी तरुण वाहून गेल्याचे सांगितले. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
दर्ग्यात अडकले १० भाविक
सकाळपासून सुरू असलेल्या पावसात कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. चारही बाजूंनी पाण्याने वेढल्याने दर्ग्यात दहा भाविक अडकले. या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
सहा ठिकाणी शॉर्टसर्किट
जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे अंधेरी सबवे येथे काळ वेळासाठी पाणी साचले होते. शहरात १, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा ६ ठिकाणी फांद्या, झाडे पडण्याच्या तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या, तर सहा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.
नदींना पूर; वाहतूक ठप्प
शहापूर आणि मुरबाड तालुक्यांत नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामध्ये शहापूर-किन्हवली-मुरबाड-डोळखांब रस्ता, मुरबाड-धसई-शिरपूर रस्ता, मुरबाड-घोरले रस्ता यांचा समावेश आहे.
पर्जन्य जलवाहिन्यांवर लक्ष
पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून पाण्याचा निचरा हाेण्यात अडथळा येऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून तत्परतेने कार्यवाही करण्यात येत आहे.