आणखी ११ अनधिकृत इमारतींवरही पडणार हातोडा; ठाणे पालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:17 IST2025-07-29T11:17:47+5:302025-07-29T11:17:47+5:30
दिवा-शीळ भागातील ३७२ कुटुंबे होणार बेघर

आणखी ११ अनधिकृत इमारतींवरही पडणार हातोडा; ठाणे पालिकेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दिवा-शीळ खान कम्पाऊंड भागात उभारण्यात आलेल्या २१ अनधिकृत इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर आता शीळ भागातील आणखी ११ इमारतींवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाडण्यात येणार आहेत. त्यातील दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य असून, एकात खासगी शाळा आणि मशीद आहे तर इतर इमारतींमध्ये ३७२ कुटुंबे वास्तव्यास असल्याचे समाेर आले आहे.
उच्च न्यायालयाने शीळ भागातील दोन भागांत उभारलेल्या ११ अनधिकृत इमारतींवर कारवाईचे निर्देश दिले. शनिवारपासून ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा पुन्हा एकदा या भागाकडे वळवला. दोन दिवसांत येथील दोन इमारतींवर कारवाई केली. तसेच, आणखी एक इमारत रिकामी केली. या इमारतींचे बांधकाम हे २०१८-१९ मध्ये झाले आहे. येथील एका जागेत १० इमारतींचे बांधकाम केले आहे. या ठिकाणच्या इमारती या ६ ते ८ मजल्यांच्या असून, येथील सर्व इमारतींमध्ये वास्तव्य दिसून आले.
शाळा, धार्मिक स्थळाचाही समावेश
इमारतीत मशीद, एका इमारतीत क्लास आणि शाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. शाळा आता रिकामी केल्याचा दावा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केला. याठिकाणी दोन विकासकांमध्ये अधिक लाभावरून वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हे प्रकरण थेट न्यायालयात गेले. या इमारती अनधिकृत असल्याने न्यायालयाने थेट कारवाईचे निर्देश दिले.
व्यापारी गाळे
कारवाई झालेल्या तळ अधिक आठ मजल्यापर्यंतच्या इमारतींमध्ये ३२९ कुटुंबांचे वास्तव्य होते, तर दुसऱ्या तळ अधिक सात मजल्यांच्या इमारतीत ४३ खोल्या, ७० च्या आसपास व्यापारी गाळे व पहिली ते १० पर्यंतची खासगी शाळा सुरू होती. या इमारतीत ४३ कुटुंबे वास्तव्यास असल्याचे समाेर आले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शीळ येथील इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. दोन इमारती जमीनदोस्त केल्या असून, उर्वरीत इमारतींंमध्ये रहिवाशांचे वास्तव्य असल्याने त्या रिकाम्या करून कारवाई केली जाणार आहे. - शंकर पाटोळे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठामपा