गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर परिणाम
By अनिकेत घमंडी | Updated: December 6, 2025 13:14 IST2025-12-06T13:13:37+5:302025-12-06T13:14:33+5:30
मध्य रेल्वेचे उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरवली स्थानक झाले आणि त्या ठिकाणी लोकल थांबा दिल्यास रेल्वे गाड्यांचा परिचालन वेळ वाढेल.

गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर परिणाम
अनिकेत घमंडी, डोंबिवली
मध्य रेल्वेच्या टिटवाळा- खडवली स्थानक दरम्यान गुरवली स्थानकाची मागणी ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली होती. मात्र हे स्थानक झाल्यास रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होईल आणि त्याचा त्रास प्रवाशांना होईल, असे कारण सांगून रेल्वे प्रशासनाने ते स्थानक होऊ शकत नाही, असे पत्राद्वारे कळवले आहे.
मध्य रेल्वेचे उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरवली स्थानक झाले आणि त्या ठिकाणी लोकल थांबा दिल्यास रेल्वे गाड्यांचा परिचालन वेळ वाढेल, त्यामुळे उपलब्ध रेल्वेगाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहेत त्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होईल, असे पत्रात नमूद केले आहे.
या पत्रामुळे १९६५ पासून ग्रामस्थांनी स्थानक व्हावे यासाठी जो पाठपुरावा आतापर्यंत केला, त्यावर पाणी फिरवले गेल्याची भावना देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच रेल्वेच्या नकारात होकार दडलेला असतो, असेही सांगत पुन्हा नव्याने पाठपुरावा करणार असल्याचे देशमुख म्हणाले.
रेल्वेकडून तीच तांत्रिक कारणे पुढे
देशमुख यांनी २८ सप्टेंबर, ६ ऑक्टोबर रोजी तेथे स्थानक व्हावे या संदर्भात मध्य रेल्वेला पत्र दिले होते. त्या पत्रांचा आधार घेत रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांच्या याच विषयीच्या पत्राला २६ ऑगस्ट २०२२, ४ जून २०२४ आणि १४ नोव्हेंबर २०२४ ला रेल्वेने हीच तांत्रिक कारणे देऊन तेथे स्थानक होऊ शकत नाही, हे वेळोवेळी स्पष्ट केले होते, असेही पत्रात म्हटले आहे.
या पत्रामुळे ग्रामस्थांचा पाठपुराव्यावर पाणी फिरलवले गेल्याची भावना रेल्वे प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणी पुन्हा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. गुरवली स्थानक झाल्यास प्रवाशांसाठी हे सोयीचेच ठरेल, असे रेल्वे प्रवासी संघटनांनी म्हटले आहे.