ठाणे जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी; निकाल ९५.५७ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:51 IST2025-05-14T08:51:40+5:302025-05-14T08:51:40+5:30
गेल्या वर्षीपेक्षा ००.०१ टक्के वाढ

ठाणे जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी; निकाल ९५.५७ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.५७ टक्के लागला. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा मुलींनीच बाजी मारली. गेल्या वर्षीपेक्षा निकालात ००.०१ टक्क्याने वाढ झाली. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९५.५६ टक्के इतका लागला होता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ या महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मंगळवारी निकाल जाहीर होताच उत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मोबाइल, लॅपटॉपवर निकाल पाहिल्यावर अपेक्षित गुण मिळालेल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, तर अपेक्षित यश न मिळालेल्या किंवा अपयशी ठरलेल्यांच्या चेहऱ्यांवर निराशा दिसत होती.
५८,०६३ मुले परीक्षेसाठी बसली होती. पैकी ५४ हजार ८७३ मुले उत्तीर्ण झाली; तर ५५,२६५ मुली परीक्षेला बसल्या होत्या. पैकी ५३ हजार ४३८ मुली उत्तीर्ण झाल्या. यात ३,१९० मुले, तर १,८२७ मुली अनुत्तीर्ण झाल्या.
मिठाईच्या दुकानांत गर्दी
ठाणे जिल्ह्यातून १,१३,३२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एक लाख आठ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफे, घरोघरी मोबाइल, संगणकावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मिठाईच्या दुकानांतही दुपारपासून गर्दी होती.