Girl's suicide by strangulation; Accused of suspicious death | गळफास घेऊन मुलीची आत्महत्या; संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप
गळफास घेऊन मुलीची आत्महत्या; संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप

नालासोपारा : उमराळे गावातील वसतिगृहात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने गुरु वारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवला आहे.
उमराळे गावातील शारदा शिशू निकेतनचे शोभा ज्योती केंद्राचे मुलींचे वसतिगृह आहे. तेथे सध्या सहा मुली राहतात. तेथे राहणाºया १७ वर्षांच्या मुलीने गुरूवारी पहाटे पाचच्या सुमारास खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांना न देता वसतीगृहाच्या संचालिका, अधीक्षक, केअर टेकर आणि इतर महिला स्टाफने तिचा मृतदेह उतरवला आणि तो तिच्या घरी घेऊन गेले. नंतर या मुलीचे नातेवाईक आणि वसतिगृहाच्या महिला स्टाफने तिला विजयनगर येथील वसई - विरार पालिकेच्या रुग्णालयात नेला. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.

संचालिका आणि केअरटेकरवर गुन्हा दाखल
केअर टेकर, संचालिका पद्मा पालित आणि दोन संचालकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी दाखल केला. आमची मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. तिच्यासोबत काही वेडेवाकडे घडले असून, तिने विरोध केल्यावर तिची हत्या केल्याचा आरोप घरच्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तो तपास करून आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मागणीही केली आहे.

मुलीच्या आत्महत्येची माहिती वसतिगृहातील केअरटेकर, संचालिका आणि महिला स्टाफने पोलिसांना दिली नाही. तिचा मृतदेह उतरवून तिच्या घरी नेला. पोलिसांपासून ही बाब लपविल्याने संस्थेच्या संचालिकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे.जे.ला पाठविला असून, तो अहवाल आल्यावर पुढील कारवाई करणार आहे.
- वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे

Web Title: Girl's suicide by strangulation; Accused of suspicious death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.