अतिप्रसंगावेळी मुलींनी दुर्गारूप घ्यावे - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 01:45 AM2018-08-17T01:45:13+5:302018-08-17T01:46:11+5:30

बलात्काराच्या घटनांसाठी बऱ्याचदा मुलींना दोष दिला जातो. वास्तविक, त्यासाठी मुलेच जबाबदार असतात. मात्र, अतिप्रसंगावेळी मुलींनी दुर्गारूप धारण करून प्रतिकार करावा

Girls should take the form of Durga during the hyperactivity - Aditya Thackeray | अतिप्रसंगावेळी मुलींनी दुर्गारूप घ्यावे - आदित्य ठाकरे

अतिप्रसंगावेळी मुलींनी दुर्गारूप घ्यावे - आदित्य ठाकरे

Next

कल्याण - बलात्काराच्या घटनांसाठी बऱ्याचदा मुलींना दोष दिला जातो. वास्तविक, त्यासाठी मुलेच जबाबदार असतात. मात्र, अतिप्रसंगावेळी मुलींनी दुर्गारूप धारण करून प्रतिकार करावा, असे आवाहन शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले.
युवासेनेच्या वतीने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये करण्यात आले होते. राज्यात मुलींवर होत असलेल्या अतिप्रसंगांच्या घटना पाहता, त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी हा युवा संवाद आयोजित केला होता. हा कार्यक्रम राज्यभरात राबवला जाणार आहे. अतिप्रसंगावेळी आरोपीच्या कान, नाक किंवा डोळ्यांवर मुलींनी आत्मविश्वासाने हल्ला केला पाहिजे. वास्तविक, आरोपी जेव्हा मुलीवर हल्ला करतो, तेव्हा तोच जास्त घाबरलेला असतो. या कृत्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होईल, याची त्याला जाणीव असते. त्यामुळे मुलींनी घाबरण्याची गरज नाही. बलात्काराच्या घटनेत मुलगी त्याठिकाणी का गेली, असे काही प्रश्न उपस्थित करून मुलींना नाहक दोष दिला जातो, अशी खंत आदित्य यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे, युवासेना अधिकारी दीपेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या भेटीची पूर्वकल्पना असल्याने प्रभागातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा बॅडमिंटन हॉल खच्चून भरला होता. आदित्य हॉलमध्ये दाखल झाल्याबरोबर त्यांनी स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी काही मुलींना व्यासपीठावर पाचारण केले. त्यावेळी इतर मुलींनीही गर्दी केल्याने गोंधळ उडाला होता. त्यांचा पूर्वेतील साकेत कॉलेजमधील कार्यक्रम उशिराने सुरू झाला. त्यामुळे बिर्ला कॉलेजचा कार्यक्रमही त्यांना आटोपता घ्यावा लागला.

साकेत कॉलजमध्येही झाले स्वसंरक्षण शिबिर

कोळसेवाडी : मुलींना स्वसंरक्षण करता यावे, यासाठी अंधेरी येथे मोफत स्वसंरक्षण शिबिर सुरू केले आहे. असेच शिबिर कल्याणमध्येही सुरू करण्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी येथे केली. कल्याण पूर्व शिवसेना-युवासेनेच्या वतीने चिंचपाडा येथील साकेत कॉलेजमध्ये कुडो इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ इंडियाच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण शिबिर गुरुवारी झाले. यावेळी प्रशिक्षक जॅक्विन नितीन व मकवाना यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साकेत कालेजचे विश्वस्त विनोद तिवारी आणि जयेश तिवारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, या कार्यक्रमानिमित्त आरोग्य विभागातर्फे साकेत महाविद्यालय ते चिंचपाडा मार्गावर स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली.

विद्यार्थिनीस आली चक्कर

साकेत कॉलेजमधील कार्यक्रमास आदित्य ठाकरे तब्बल दोन तास उशिरा आले. त्यांची वाट पाहात ताटकळल्याने एका विद्यार्थिनीस चक्कर आली. मात्र, तिचे नाव समजू शकलेले नाही.
 

Web Title: Girls should take the form of Durga during the hyperactivity - Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.