घोडबंदर रोड होणार आणखी सुसाट

By Admin | Updated: September 8, 2016 02:52 IST2016-09-08T02:52:36+5:302016-09-08T02:52:36+5:30

नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन एमएमआरडीएने आता या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे निश्चित केले आहे.

Ghodbunder road will be more comfortable | घोडबंदर रोड होणार आणखी सुसाट

घोडबंदर रोड होणार आणखी सुसाट

ठाणे : नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन एमएमआरडीएने आता या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे निश्चित केले आहे. यात आनंदनगर, कासारवडवली आणि ओवळा-माजिवडा येथील उड्डाणपुलांचा समावेश असून हे पूल झाल्यास घोडबंदर रोडवरील वाहतूक आणखी सुसाट होणार आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक आणि ठाणे महापालिकेच्या मागणीनुसार एमएमआरडीए हे उड्डाणपूल बांधणार असून त्यांच्या बांधकामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रकल्प सल्लागार नेमण्यासाठी एमएमआरडीएने एकीकडे निविदा मागवल्या असताना दुसरीकडे ते बांधण्यासाठीच्या पूर्वीच्या अटी आणि शर्तींत काही मोजके बदलही केले आहेत.
ठाणे शहरासह घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मोठ्या चतुराईने स्थानिकांना विश्वासात घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण केले. या तीन ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास पावसाळ्यात पाणी साचून कोंडी होणार नाही, याकरिता या तिन्ही पुलांचा उतारा शोधला आहे.
याबाबत, आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या मार्गावरील वाहतूककोंडी सोडवून घोडबंदर परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन आपण या मार्गावर उड्डाणपुलासाठी सुमारे ८० कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घेतला आहे. मात्र, तीनऐवजी एक अखंड उन्नत मार्ग बांधल्यास येथील वाहतूक सुरळीत व सुसाट होऊन वाहनचालकांचा वेळ, श्रम आणि पैशांसह इंधनात बचत होईल, असा प्रस्ताव आपण एमएमआरडीएला दिला आहे. त्यानुसार, त्यांच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून आता प्रकल्प सल्लागार नेमण्यासाठी या निविदा मागवल्या आहेत. त्या तीन उड्डाणपुलांसाठी असल्या तरी आपल्या सूचनेनुसार एक अखंड उन्नत मार्ग बांधता येईल काय, याचाही विचार त्यात केला जाणार आहे. येत्या डिसेंबरअखेर या कामास सुरुवात करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने आपणास दिले असल्याचे सरनाईक म्हणाले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Ghodbunder road will be more comfortable