वाहतूककोंडीमुळे घोडबंदर रस्ता दुरुस्ती रखडली; अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा बार ठरला 'फुसका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:35 IST2025-11-24T12:33:42+5:302025-11-24T12:35:37+5:30
रस्ता दुरुस्तीचे कामदेखील अपूर्णच राहिले आहे.

वाहतूककोंडीमुळे घोडबंदर रस्ता दुरुस्ती रखडली; अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा बार ठरला 'फुसका'
लोकमत न्यूज नेटवर्क, मिरारोड: घोडबंदर मार्गावर काजू पाडा खिंड ते वरसावे नाका या दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २३ नोव्हेंबरला अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी घालण्यात आल्याची अधिसूचना पोलिसांनी जारी केली होती. मात्र प्रत्यक्षात ही अधिसूचना फुसका बार ठरली आणि सर्रास अवजड वाहने घोडबंदर मार्गावर आल्याने मोठी वाहतूक कोंडी नागरिकांना सहन करावी लागली. शिवाय रस्ता दुरुस्तीचे कामदेखील अपूर्णच राहिले आहे.
मीरा भाईंदर महापालिकेने ठाण्याकडून वरसावे दिशेने येताना घोडबंदर मार्गावरील काजूपाडा खिंड ते वरसावे नाका रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती व रस्ता मजबुतीकरणची कामे करण्यासाठी रविवार २३ नोव्हेंबरला घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्यासाठी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय उपायुक्त अशोक वीरकर यांनी अधिसूचना जारी केली होती. महामार्गावरील शिरसाड फाटा व चिंचोटी मार्गे अवजड वाहने जाण्याचे पर्यायी मार्ग निश्चित झाले होते. प्रत्यक्षात मात्र अवजड वाहन बंदीचे काटेकोर पालन करण्यात वाहतूक पोलीस सपशेल अपयशी ठरले. त्यामुळेच घोडबंदर मार्गावर अवजड वाहने मोठ्या संख्येने आल्याने वाहतूक कोंडी झाली.
घोडबंदर मार्गावर काजूपाडा खिंड येथून दोन्ही बाजूने २०-२५ मिनिटांनी वाहने सोडली जात होती. अवजड वाहनां मुळे कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घोडबंदर मार्गावर वाहतूक पोलीस निरीक्षक सागर इंगोले, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर जगताप सह अन्य अधिकारी व वाहतूक पोलिसांनी वाहतूकीचे नियोजन केले. तर काजूपाडा खिंड ते वरसावे नाका पर्यंतच्या आणि वरसावे नाका ते चेणे पूल पर्यंतच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती महापालिके कडून केली जाणार होती. परंतु प्रत्यक्षात मात्र काजूपाडा खिंड पासून चेणेगाव सिग्नल पर्यंतच्या रस्त्याचीच दुरुस्ती केली गेली आहे.
ग्राऊटींग करून मास्टिक अस्फाल्ट केले गेले असून काजूपाडा सिग्नल येथे रॅपिड हार्डनिंग काँक्रीट चे काम केले गेले. मोठे ४ ठिकाणी तर २ ठिकाणी लहान पॅचवर्क केले गेले. शनिवारच्या मध्यरात्री नंतर पालिकेने शहर अभियंता दिपक खांबित यांच्या मार्गदर्शनाखाली कामास सुरवात केली होती. कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, शाखा अभियंता प्रफुल्ल वानखेडे आदी रात्री पासून सकाळ पर्यंत उपस्थित होते. सायंकाळी ४ -५ दरम्यान काम पूर्ण झाले असले तरी ते सुकण्यासाठी काही तास लागणार असल्याचे पालिके कडून सांगण्यात आले. तर उर्वरित रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी पुन्हा एका मार्गिकेवर वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन करावे लागणार आहे.