राजकारणाच्या बुरख्याआड गँगस्टरच पोसतात गुन्हेगारांना; शहरात दहशत माजवण्याचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:28 IST2025-07-10T06:27:37+5:302025-07-10T06:28:12+5:30

बदलापूर, अंबरनाथ शहरामध्ये दहशत माजविण्याचे प्रकार उघडकीस, अनधिकृतपणे शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशा कारवाईतून गुन्हेगारीचे हे प्रकार रोखण्यात पोलिसांना यश येईल, असा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

Gangsters feed criminals behind the veil of politics; a way to spread terror in the Badlapur, Ambernath city | राजकारणाच्या बुरख्याआड गँगस्टरच पोसतात गुन्हेगारांना; शहरात दहशत माजवण्याचा प्रकार

राजकारणाच्या बुरख्याआड गँगस्टरच पोसतात गुन्हेगारांना; शहरात दहशत माजवण्याचा प्रकार

पंकज पाटील

अंबरनाथ : थेट गुन्हेगारांच्या विश्वात वावरल्यास तुरुंगातील वातावरण आणि जीवन असह्य होणार याची कल्पना असल्यामुळेच आता काही गुंड राजकारणाचा बुरखा ओढून आपल्या शूटर्सना गुन्हेगारीच्या विश्वात दबंगगिरी करण्यास भाग पाडत आहेत. ते करण्यासाठी या शूटर्सना गावठी बनावटीचे पिस्टल सहज उपलब्ध होत आहे. याच बंदुकीच्या जोरावर शहरात दहशत माजविण्याचे काम सध्या बदलापूर आणि अंबरनाथ शहरामध्ये सुरू आहे.

गेल्या वर्षभरात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात संघटित गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहर पातळीवर आणि राजकारणात दबदबा मिळविण्यासाठी गुन्हेगार प्रवृत्तीचे गुंड आता राजकारणाचा बुरखा ओढून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिवसाढवळ्या भर चौकात गोळीबाराचे प्रकार वाढत असताना या गुन्हेगारांकडे गावठी बनावटीचे पिस्टल येतात कुठून हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. 

छोट्या मोठ्या गुन्ह्यांत तुरुंगवारी करून आल्यानंतर या नवख्या गुन्हेगारांना ओढ लागते ती एखाद्या गॅंगमध्ये सामील होण्याची. गॅंगच्या म्होरक्याकडून दहशत माजविण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणारी गावठी बनावटीची पिस्टल एकदा हातात आल्यानंतर आपल्या म्होरक्यासाठी काहीही करण्याची धमक या गुन्हेगारांमध्ये निर्माण होते. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गस्तीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. यामध्ये अनधिकृतपणे शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशा कारवाईतून गुन्हेगारीचे हे प्रकार रोखण्यात पोलिसांना यश येईल, असा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

बडे दिग्गज आता राजकारणात
बदलापुरात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर थेट एका गुन्हेगाराला दुसऱ्या गुन्हेगाराने मानेवर गोळी चालविली. अंबरनाथ आणि बदलापुरात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असलेले बडे दिग्गज हे आता राजकारणात सक्रिय झाले असून, त्यांनी आता नव्या गुन्हेगारांना आपल्या सोबत ठेवून शहरात आपली दहशत कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दहशतीसाठी बंदुकीची गरज
कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात कोठडीची हवा खाऊन बाहेर पडल्यानंतर हे गुन्हेगार शहर पातळीवर आर्थिक लाभासाठी कामे मिळवायचा प्रयत्न करतात. त्यातूनच दहशतीची आणि हातात बंदुकीची गरज भासते. हे प्रकार राेखण्याचे पाेलिसांसमाेर माेठे आव्हान आहे.

१० ते ३० हजारांत गावठी कट्टा
४० हजारांपासून एक लाखापर्यंत गावठी पिस्टल सहज उपलब्ध होते, तर गावठी कट्टा १० ते ३० हजारांमध्ये उपलब्ध होतो. उत्तर भारतातून याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.

बंदुकीच्या मोहापायी गँगमध्ये सहभागी
तलवार आणि चॉपर घेऊन दहशत माजविणारे गुन्हेगार आता बंदुकीच्या मोहापायी एखाद्या गॅंगमध्ये समाविष्ट होऊन संघटित गुन्हेगारीकडे वळत आहेत.

उत्तर प्रदेश, बिहारमधून पिस्टलची खरेदी-विक्री
एकेकाळी मोठ्या गुन्हेगारांकडे दिसणारी गावठी बनावटीची पिस्टल आता सहज लहानमोठ्या गुन्हेगारांकडेही उपलब्ध होते. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतून गावठी बनावटीच्या पिस्टलची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते.

Web Title: Gangsters feed criminals behind the veil of politics; a way to spread terror in the Badlapur, Ambernath city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.