शिंदेसेनेला स्वबळापासून रोखण्यासाठी मोर्चेबांधणी; ठाण्यात भाजपने अजित पवार गटाला घेतले सोबत
By अजित मांडके | Updated: October 15, 2025 09:50 IST2025-10-15T09:50:12+5:302025-10-15T09:50:26+5:30
जुने ठाणे हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. महापालिकेत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हाच पट्टा महत्त्वाचा मानला गेला.

शिंदेसेनेला स्वबळापासून रोखण्यासाठी मोर्चेबांधणी; ठाण्यात भाजपने अजित पवार गटाला घेतले सोबत
- अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या गडात त्यांना शह देण्याकरिता भाजपने उघडपणे अजित पवार गटाला सोबत घेतले आहे. ठाण्यात ठाकरे बंधूंची युती व त्यांना असलेली शरद पवार गट व काँग्रेसची साथ यामुळे शिंदे यांची स्वबळावरील घोडदौड रोखण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार महापालिकेतील भ्रष्टाचार, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूककोंडी अशा मुद्द्यांवरून शिंदेसेनेला भाजप व उद्धवसेना दोन्ही पक्ष घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जुने ठाणे हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. महापालिकेत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हाच पट्टा महत्त्वाचा मानला गेला. मागील काही वर्षांपासून शिवसेनेची जादू ओसरून याठिकाणी भाजपचा वरचष्मा दिसून आला. मागील निवडणुकीत भाजपने काही नवखे चेहरे देऊन त्यांना विजयी केले. विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून संजय केळकर ५८,२५३ मतांच्या फरकाने निवडून आले. याठिकाणी उद्धवसेनेचे राजन विचारे यांना ६२,१२०, तर मनसेच्या उमेदवाराला ४२,५९२ मते मिळाली. ठाकरे बंधूंच्या पक्षाच्या उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षा अधिक मते केळकर यांना मिळाली होती. त्यामुळे शिंदेंना वेसण घालण्याकरिता भाजपने मनसे अथवा उद्धवसेनेच्या उमेदवारांना बळ पुरवले, तर जुन्या ठाण्यात शिंदेंना हादरा बसू शकतो.
ठाण्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद आहे. कळव्यातील आव्हाड समर्थक नगरसेवकांचा एक मोठा गट काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेत सहभागी झाला. त्यामुळे शिंदे यांच्याविरोधात महापालिका निवडणूक लढविण्याचे मोठे आव्हान ठाकरे, तसेच शरद पवार यांच्या पक्षांपुढे आहे. ठाण्यात शिंदे यांच्यासमोर आव्हान उभे करायचे असेल, तर एकत्र येऊन लोकांपुढे जावे लागेल याची जाणीव महाविकास विकास आघाडीला झाली आहे. त्यामुळेच ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चाला काँग्रेस, शरद पवार गटाने पाठिंबा दिला. शिंदेंविरोधातील महाविकास आघाडीची एकजूट व त्याला ठाण्यात भाजपची छुपी साथ लाभली, तर शिंदेंचे स्वबळ रोखणे भाजपला शक्य होईल.
पक्षीय बलाबल
ठाण्यात शिंदेसेनेचे ६४ नगरसेवक आहेत. भाजपचे २३ नगरसेवक असून, उद्धवसेनेकडे तीन, शरद पवार गटाकडे अंदाजे १४ नगरसेवक उरले आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक विजयी झाले होते. काँग्रेसचे तीन, तर एमआयएमचे दोन नगरसेवक निवडून आले होते.
समस्यांचा पाढा
ठाणेकरांना सध्या पाण्याची समस्या भेडसावत आहे, वाहतूककोंडी, पार्किंग, रस्त्यावरील खड्डे, आदी समस्यांबरोबर महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा मागील काही दिवसांपासून पुढे आला आहे. हेच मुद्दे जनतेसमोर घेऊन भाजप, उद्धवसेना आणि मनसे लोकांसमोर जात आहे.