ठाणे जिल्ह्यातील ११ हजार बालकांच्या मोफत शालेय प्रवेश प्रक्रियेला वेग
By सुरेश लोखंडे | Updated: April 21, 2023 15:10 IST2023-04-21T15:06:07+5:302023-04-21T15:10:02+5:30
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण ६२८ पात्र शाळांमध्ये या बालकांचे प्रवेश करण्यात येणार आहे

ठाणे जिल्ह्यातील ११ हजार बालकांच्या मोफत शालेय प्रवेश प्रक्रियेला वेग
ठाणे : शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील १० हजार ९९६ बालकांची मोफत शालेय प्रवेशासाठी पहिल्या यादीत निवड झाली आहे. आरक्षित ठेवलेल्या २५ टक्के जागांवर या बालकांना केजी ते पहिलीच्या वर्गात मोफत शालेय प्रवेश देण्यासाठी यंत्रणा जिल्हाभर सतर्क झाली आहे. २०२३ - २०२४ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे.
या शालेय प्रवेशासाठी प्रथम फेरीमध्ये १० हजार ९९६ निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश प्रक्रीयेची सुरुवात झाली असून पालकांना एस एम एस द्वारे पालकांना बालकाच्याचे शाळेचे नाव अवगत करण्यात येत आहे. पण पालकांनी केवळ या एस एमएसवर वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण ६२८ पात्र शाळांमध्ये या बालकांचे प्रवेश करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण १२ हजार २६३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश निश्चितीसाठी ॲलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केंद्रामध्ये पडताळणी समितीकडून शासनाने निश्चित केलेल्या २५ एप्रिल पर्यंत करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या या आरटीई पोर्टलवरुन ॲलोटमेंट लेटर व प्रवेश प्रक्रीयेकरिता आवश्यक कागदपत्रे मुळ प्रतींसह दोन संच घेऊन पडताळणी केंद्रावर उपस्थित होणे अपेक्षित आहे.