लॅपटॉप अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 20:55 IST2021-06-01T20:53:29+5:302021-06-01T20:55:21+5:30
लॅपटॉप अद्ययावत करण्याच्या बहाण्याने लॅपटॉपची चोरी करणाऱ्या देवेंद्र प्यारे उपाध्याय ऊर्फ सूरज (२४, रा. टिटवाळा) आणि तो विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या यश गिरी (२४, रा. भांडूप, मुंबई) अशा दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

कापूरबावडी पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लॅपटॉप अद्ययावत करण्याच्या बहाण्याने लॅपटॉपची चोरी करणाऱ्या देवेंद्र प्यारे उपाध्याय ऊर्फ सूरज (२४, रा. टिटवाळा) आणि तो विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या यश गिरी (२४, रा. भांडूप, मुंबई) अशा दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० हजारांचे दोन लॅपटॉपही हस्तगत केले आहेत.
कापूरबावडी भागात राहणारी एक महिला नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. कोरोनामुळे तिला कंपनीने घरूनच (वर्क फ्रॉम होम) काम करण्याची सवलत दिली आहे. ती नोव्हेंबर २०२० मध्ये घरीच काम करीत असताना एका भामट्याने तिच्या कंपनीतून आल्याचा दावा केला. कंपनीनेच लॅपटॉप अपडेटसाठी मागितल्याचे सांगून तिच्याकडून लॅपटॉप घेऊन तो पसार झाला. नंतर तिने कंपनीत विचारणा केली तेंव्हा असे कोणालाही कंपनीने लॅपटॉपच्या अपडेटसाठी पाठविले नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी तिने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, जमादार राजेंद्र मोरे, हवालदार शरद खोडे आणि पोलीस नाईक निखिल जाधव आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे २४ मे २०२१ रोजी आधी देवेंद्र प्यारे याला अटक केली. त्याच्या चौकशीत लॅपटॉप विक्रीसाठी मदत करणारा यश गिरी यालाही २६ मे रोजी अटक केली. त्यांच्याकडून या महिलेच्या लॅपटॉपसह आणखी एक अशाच प्रकारे लंपास केलेला लॅपटॉपही जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे अधिक तपास करीत आहेत.