ठाण्यातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली साडेचार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 21:49 IST2019-10-12T21:44:36+5:302019-10-12T21:49:41+5:30
नौदलातून निवृत्त झालो असून आता आपण पत्रकार आहे. त्यामुळे चांगल्या ओळखी असल्याने ठाण्यातील नामांकित शाळेत मुलाचे अॅडमिशन करुन देतो, असे सांगत साडे चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बांद्रा येथील प्रकाश गायकवाड याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘तुमच्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देतो’, अशी बतावणी करून सुमारे साडेचार लाखांची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील प्रकाश लक्ष्मण गायकवाड (४७) याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्याचे वर्तकनगर, नवीन म्हाडा वसाहत येथील रहिवासी संदीप शिराळ यांची बांद्रा येथील गायकवाड याच्याशी काही दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. आपल्या मुलाला ठाण्यातील एका चांगल्या शाळेत ज्युनिअर केजीमध्ये प्रवेश घ्यायचा असल्याचे गायकवाड याला सांगितले होते. दरम्यान, आपण नौदलामध्ये राजीनामा दिला असून आता पत्रकार म्हणून काम करीत असल्याचे सांगून आपली चांगल्या शाळांच्या व्यवस्थापनाबरोबर ओळख असल्याची बतावणी त्याने केली होती. त्यामुळे तुमच्या मुलाचे चांगल्या शाळेत प्रवेशाचे काम मी खात्रीने करून देतो, असे सांगून त्याने शिराळ यांचा विश्वास संपादन केला. नंतर, त्यापोटी २८ जानेवारी २०१९ रोजी दोन लाख ८० हजार रुपये घेतले. तसेच ९ मार्च २०१९ रोजी एक लाख ७० हजार रुपये अशी एकूण चार लाख ५० हजारांची रक्कम त्यांच्याकडून घेतली. मात्र, त्यांच्या मुलाचा कोणत्याही शाळेत त्याने प्रवेश मिळवून दिला नाही. शाळेचा प्रवेश किंवा साडेचार लाखांच्या रकमेबाबत त्यांनी वारंवार विचारणा करूनही तो टाळाटाळ करीत होता. तेव्हा शिराळ यांनी त्याला साडेचार लाखांची रक्कम परत करण्यास सांगितले. तेव्हा गायकवाड याने त्यांना शिवीगाळ करून दमदाटीही केली. या प्रकाराला कंटाळून शिराळ यांनी अखेर याप्रकरणी ११ आॅक्टोबर २०१९ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक ए.बी. जाधव याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.